
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई हे येत्या 17 नोव्हेंबरला सेवानिवृत्त होणार आहेत. निवृत्तीनंतर ते गुवाहाटीतील बंगल्यात वास्तव्याला जाणार असून तेथील उच्च न्यायालयाने त्यांच्यासाठी स्वीय सचिव (पीए), कार, शिपाई यासह विविध सेवांची ऑफर दिली आहे. यासंदर्भात शिष्टाचार समितीने मांडलेल्या प्रस्तावाला गुवाहाटी उच्च न्यायालयाने सोमवारी मंजुरी दिली.
सरन्यायाधीश गोगोई यांनी वकिली क्षेत्रात पाऊल ठेवल्यानंतर सुरुवातीच्या काळात गुवाहाटी उच्च न्यायालयात प्रॅक्टिस केली होती. त्यानंतर कायद्याचा गाढा अभ्यास करून ते देशाच्या सरन्यायाधीशपदी विराजमान झाले. ही आमच्यासाठी सन्मानाची आणि अभिमानाची बाब आहे, असे उच्च न्यायालयाच्या शिष्टाचार समितीने म्हटले आहे. याच भावनेतून समितीने सरन्यायाधीश गोगोई यांना सेवानिवृत्तीनंतर गुवाहाटीतील बंगल्यावर विविध सेवा पुरवण्याची तयारी दाखवली.
या मिळणार सुविधा
सरन्यायाधीश गोगोई व त्यांच्या पत्नीच्या सेवेत दैनंदिन कामांसाठी एक स्वीय सचिव असणार आहे.
दोघांसाठी एक चतुर्थश्रेणी कर्मचारीही असेल. तसेच गुवाहाटीतील बंगल्यावर शिपाई असेल.
सरन्यायाधीशांच्या सेवेत एक चांगल्या दर्जाची कार असेल.
त्याचबरोबर एक नोडल अधिकारीसुद्धा सेवेत असणार आहे.






















































