
कश्मीर खोऱ्याला स्वायत्तता देणारे कलम 370 केंद्र सरकारने हटविल्यानंतर चवताळलेले पाकिस्तानी दहशतवादी अजूनही शांत झालेले नाहीत. सोमवारी पहाटे येथील श्रीनगरमधील लाल चौकातील भर बाजारात दहशतवाद्यांनी हिंदुस्थानी सुरक्षा दलांवर ग्रेनेडच्या सहाय्याने चढवलेल्या हल्ल्यात एकजण ठार झाला असून 15जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तत्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
कश्मीरमध्ये सुरक्षा दलाला लक्ष्य करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढले आहे. कलम 370 हटवून केंद्र सरकारने जम्मू-कश्मीरचे विभाजन केल्यापासूनच दहशतवाद्यांकडून हे प्रकार सुरू झाले आहेत. पोलिसांनी सांगितले की, दहशतवाद्यांनी ग्रेनेड फेकला, पण तो रस्त्याच्या कडेला पडला. त्याच्या स्फोटात किमान 25 सर्वसामान्य नागरीक सापडले. हा स्फोट श्रीनगरच्या हरीसिंह स्ट्रीट या भरगर्दीच्या ठिकाणी झाला.
यापूर्वी 29 ऑक्टोबरलाही दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांना लक्ष्य करीत पुलवामा येथे सीआरपीएफच्या एका पॅट्रोल टीमवर हल्ला चढवला होता. त्यावेळी दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार केला होता. मात्र या घटनेत कुणीही जखमी झाले नव्हते. त्याआधी दिवाळीच्या एक दिवस आधी 26 ऑक्टोबरलाही श्रीनगरच्या काकासराय भागात सीआरपीएफ जवानांवर दहशतवाद्यांनी ग्रेनेडद्वारे हल्ला चढवला होता. त्यात एक जवान जखमी झाला होता.



























































