
दैनंदिन आयुष्यातला ऑफिस हा एक महत्त्वाचा भाग आहे. आपण आपल्या आयुष्यतला बहुतांश वेळ ऑफिसमध्येच व्यतित करतो. त्यामुळे तिथे असलेली साप्ताहिक सुट्टी हा सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय असतो. कारण, कामाच्या ताणातून बाहेर येऊन स्वतःकडे आणि घराकडे लक्ष देण्यासाठी ही सुट्टी अत्यंत उपयुक्त असते. ती जास्तीत जास्त एक किंवा दोन दिवसांची असते. पण, आता तीन दिवसांची सुट्टी देण्याचा विचार राबवला जात आहे.
जपानमधल्या मायक्रोसॉफ्ट कंपनीने हा अनोखा प्रयोग करून पाहिला आणि त्याचे अतिशय सकारात्मक परिणाम दिसून आले. मायक्रोसॉफ्ट जपानच्या टोकियो इथल्या मुख्यालयातील कर्मचाऱ्यांना काही महिने चार दिवसांचा आठवडा या स्वरुपात काम करावं लागलं. त्यानुसार त्यांना तीन दिवस सुट्टीही देण्यात आली. त्याखेरीज त्यांना प्रवास भाडे आणि इतर जरुरी भत्तेही देण्यात आले. जवळपास दोन महिन्यांनी त्यांना दिसून आलेले बदल विलक्षण होते. कारण कर्मचाऱ्यांच्या क्रयशक्तीत 40 टक्क्यांनी वाढ झाली होती. तसंच वीज, कागद यांचीही बचत झाली होती आणि तुलनेने अधिक चांगलं काम पार पडलं होतं.
जपानमध्ये हा बदल सहजासहजी घडून आला नाही. 2016च्या जी-7 या समिटमध्ये जपानची क्रयशक्ती अत्यंत कमी असल्याचे अहवाल होते. जपानने या अहवालाचा गांभीर्याने विचार केला. त्यावर उपाय काय करता येईल यावर विचार करण्यात आला. खासगी मालकीच्या कंपनींमध्ये चार दिवसांचा आठवडा करण्याचा प्रयोग करून पाहण्यात आला आणि या प्रयोगातून सकारात्मक बदल दिसून आले. अनेक खासगी कंपन्यांमधील क्रयशक्तीत वर्षागणिक सरासरी 9 टक्के वाढ दिसून आली. त्यामुळे जपानमध्ये सार्वजनिक क्षेत्रांमध्येही याचा प्रयोग करण्यात येण्याचा विचार प्रस्तावित आहे.

























































