
माणगाव तालुक्यातील विचवली येथे वीज अंगावर पडून दोन जण जागीच ठार झाले असून यामध्ये सहा वर्षाची मुलगी बालंबाल बचावली आहे. तिच्यावर माणगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रविद्रं सिताराम दिवेकर, (30 रा. विचवली, माणगाव), मनोहर साबजी देसाई (69) हे दोघे वीज अंगावर पडून ठार झाले आहेत.
माणगाव तालुक्यात सायंकाळ पासून विजांच्या कडकडाटासह पावसाने सुरुवात केली आहे. रवींद्र दिवेकर हे आपल्या सहा वर्षाच्या मुलीसोबत ऍक्टिव्हावर विचवली येथे आले असता पाऊस लागल्याने एका झाडाखाली उभे राहिले. त्यावेळी दिवेकर बाप लेक उभ्या असलेल्या झाडावर वीज कोसळली. दिवेकर यांच्या मुलीच्या कानाला लागून वीज रवींद्र यांच्या अंगावर पडून ते जागीच ठार झाले तर कन्या ही जखमी झाली आहे.
मनोहर देसाई हे रिक्षाचालक भाडे सोडून माणगाव कडे येत असताना विचवली पासून 10 मीटर अंतरावर आले असता वीज रिक्षावर पडून मनोहर देसाई यांचा जागीच मृत्यू झाला. दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचे प्राण गेले असून दिवेकर यांची मुलगी यातून वाचली असून तिच्यावर माणगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.




























































