
आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने (एफआयएच) 2023 च्या पुरुष विश्वचषक हॉकी स्पर्धेचे यजमानपद हिंदुस्थानला बहाल केले आहे. त्यामुळे हिंदुस्थानला सलग दुसऱ्यांदा आणि एकूण चौथ्यांदा विश्वचषक हॉकी स्पर्धेचे यजमानपद भूषवण्याचा बहुमान लाभणार आहे.
पुरुषांची विश्वचषक हॉकी स्पर्धा आता हिंदुस्थानात 13 ते 29 जानेवारी या कालावधीत खेळवली जाईल असे एफआयएचने कळवले आहे. त्याचबरोबर एफआयएचच्या गेल्या वर्षी झालेल्या बैठकीत स्पेन आणि हॉलंडला 2022 च्या महिला विश्वचषक हॉकीचे यजमानपद देण्यात आले होते. हिंदुस्थानातील स्पर्धेचे ठिकाण अद्याप निश्चित झाले नसले तरी ओडिशातील भुवनेश्वर हे आता हॉकीचे माहेरघर बनले आहे. त्यामुळे भुवनेश्वरमधील कलिंगा येथेच विश्वचषक हॉकी स्पर्धेचे आयोजन होण्याची शक्यता आहे.
विश्वचषक हॉकी स्पर्धेचे चौथ्यांदा आयोजन करणारा हिंदुस्थान हा पहिला देश ठरणार आहे. याआधी हिंदुस्थानने 1982 (मुंबई), 2010 (नवी दिल्ली) आणि 2018 (भुवनेश्वर) साली विश्वचषक हॉकी स्पर्धा आयोजित केली होती.

























































