
दीड महिन्यापूर्वी कुलाबा येथे राहणारा 16 वर्षांचा गतिमंद असलेला तरुण गुप्ता हा मुलगा आरपीएफ जवानांच्या निष्क्रिय कारभारामुळे त्याच्या पालकांपासून दुरावला आहे.
पालकांसोबत कुलाबा येथे राहणारा तरुण दीड महिन्यापूर्वी एका राजकीय पक्षाच्या रॅलीसोबत नकळत फोर्टपर्यंत गेला. तेथे गेल्यानंतर तो भरकटला. त्याचे बोलणे समजत नसल्याने लोकांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. अखेर तरुण सीएसएमटी स्थानकात गेला आणि तेथून लोकलने पनवेल स्थानकात पोहचला. तेथे त्याला आरपीएफ जवानांनी ताब्यात घेतले, पण त्याची कोणतीही माहिती रेल्वे पोलिसांना दिली नाही. उलट त्याला दोन दिवस आपल्या ताब्यात ठेवल्यानंतर तिसर्या दिवशी तुतारी एक्स्प्रेसच्या पार्सल बोगीत बसवून दिले. त्यामुळे तो गोव्याला पोहचला. तेथून तो पुन्हा त्याच फलाटावर आलेल्या एक्स्प्रेसमधून मुंबईत आला. तो वांद्रे स्थानकात आला. तेथून चर्चगेट स्थानकातदेखील आला. पण या सर्व कालावधीत आरपीएफ जवानांनी त्याची हेळसांड केली, असा आरोप तरुणच्या पालकांनी केला आहे.
सीसीटीव्हीत निर्दयीपणा कैद
मुलगा बेपत्ता झाल्यानंतर आम्ही एमआरए पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तरुणचा शोध सुरू केला. आमच्या सोबत पोलीस प्रत्येक ठाण्यातील सीसीटीव्ही तपासत होते. पनवेल स्थानकात आरपीएफ जवानांनी केलेले निर्दयी कृत्य कैद झाले आहे. त्यांनी मदतीसाठी आर्जव करणार्या तरुणला जबरदस्तीने तुतारी एक्स्प्रेसमध्ये बसवून पाठवून दिले, पण पोलिसांना कळविण्याचे कष्ट घेतले नाही. आम्ही विचारपूस करायला गेल्यावर उलट आमच्याशी असभ्य वर्तणूक केली. आरपीएफ जवानांच्या निर्दयीपणामुळे तरुण आमच्यापासून लांब गेलाय. त्याच्या येण्याकडे आमच्या नजरा लागल्या असल्याच्या तरुणाच्या पालकांनी सांगितले.





















































