पवारांच्या घरीही बैठकांचा सपाटा, उद्या राष्ट्रवादीच्या आमदारांची महत्त्वपूर्ण बैठक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
sharad-pawar

‘वर्षा’वर भाजपची बैठक सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानीही बैठकांचा सपाटा सुरू होता. राष्ट्रवादीच नव्हे तर अनेक काँग्रेस नेतेही पवारांशी चर्चा करत होते. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसची मंगळवार, 12 नोव्हेंबरला महत्त्वपूर्ण बैठक होणार असून त्यानंतरच राज्याच्या सत्ताकारणाला प्रचंड वेग येणार आहे.

दुपारी पवार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना बोलावले आणि त्यांच्याशी प्रदीर्घ चर्चा केली. त्याचवेळी जयपुरातून काँग्रेस आमदारांच्या सत्तेतील सहभागाबाबतचे वृत्त वाहिन्यांवर झळकू लागले. याबाबत पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, माझ्याकडे याबाबत कोणतीच अधिकृत माहिती नाही. त्यामुळे यावर कोणतीही प्रतिक्रिया देणे योग्य होणार नाही.

संध्याकाळी काँग्रेसच्या काही नेत्यांनीही पवारांचे निवासस्थान गाठले आणि त्यांच्याशी चर्चा केली. या चर्चेचा तपशील समजू शकला नसला तरी काहीही झाले तरी भाजपला सत्तेत येऊ द्यायचे नाही. त्याचीच आखणी करण्यात आल्याचे राष्ट्रवादीच्या एका नेत्याने सांगितले. दरम्यान, भाजप सरकार बनवण्यात अपयशी ठरला तर आम्ही पर्यायी सरकार देऊ. शिवसेनेने आम्हाला प्रस्ताव द्यावा. आम्ही निर्णय घेऊ, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकारांना दिली आहे.