
व्हॉट्सऍप स्टेटस पाहून सराफी व्यापाऱयाला मोटारीत बसवून चाकूच्या धाकाने लुटणाऱया चौघांच्या टोळीला पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले. त्यांच्या ताब्यातून 9 किलो 500 ग्रॅम सोन्याची बिस्किटे, सोन्याच्या तीन पट्टय़ा, चार मोबाईल, पिस्तूल, मोटार मिळून 3 कोटी 71 लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला.
गणेश दगडू पवार (27), अभिजित उर्फ बाळू दिलीप चव्हाण (23, दोघेही रा. नागणखोरा, सांगोला, सोलापूर), मोहसीन हमजेखान मुलाणी (25) आणि प्रथमेश विजय भांबुरे (26, दोघेही रा. आटपाडी, सांगली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी अप्पा श्रीराम कदम (रा. कौठळी, आटपाडी, सांगली) यांनी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अप्पा सोने खरेदी-विक्रीचे व्यापारी असून, ते मित्रासमवेत कोलकाता ते मुंबई प्रवास करून 6 नोव्हेंबरला सकाळी पावणेसहाच्या सुमारास दौंड रेल्वेस्थानकात उतरले होते. त्यानंतर दोघेही एका मोटारीतून कुरकुंभवरून भिगवणमार्गे जात होते. त्यावेळी मोटारीतील चौघांनी मिळून अप्पासह त्यांच्या मित्राला मारहाण करीत चाकूच्या धाकाने सोन्याची बिस्किटे चोरून नेली.
स्टेटस पाहून दरोडा
व्यापारी अप्पा कदम नेहमी सोने खरेदी करून आल्यानंतर दौंड रेल्वेस्थानकात उतरून परिसरातून प्रवास करीत होते. त्यांना व्हॉट्सऍपवर स्टेटस ठेवण्याची सवय होती. आरोपीही सांगोला परिसरातील असल्यामुळे त्यांच्याकडे अप्पांचा मोबाईल क्रमांक होता. आरोपी अप्पांच्या स्टेटसवर पाळत ठेवून होते. त्यानुसार 6 नोव्हेंबरला अप्पा सोनेखरेदीसाठी घरातून गेल्यानंतर त्यांनी गुड बाय कौठळी असे स्टेटस ठेवले होते. त्यामुळे आरोपींना अप्पा सोनेखरेदीसाठी बाहेर गेल्याची माहिती मिळाली. त्यानंतर चारही आरोपींनी दरोडय़ाचा डाव रचला. 6 ऑक्टोबरला दौंड रेल्वेस्थानकात उतरल्यानंतर आरोपींनी अप्पा मोटारीत बसल्यानंतर चाकूच्या धाकाने त्यांच्याकडील 9 किलो 600 ग्रॅम सोन्याची बिस्किटे चोरून नेली.




























































