उत्तर प्रदेशात माय लेकींवर अॅसिड हल्ला; आरोपीला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेशमधील भदोरी जिल्ह्यात संपत्तीच्या वादातून महिला आणि तिच्या दोन मुलींवर अॅसिड हल्ला झाल्याची घटना घडली आहे. महिला आणि तिच्या मुलींची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते आहे. त्यांना उपचारसाठी वाराणसी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी या हल्ल्यातील आरोपी विमलेश कुमार याला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विमलेश कुमार हा तहसील कार्यलयात लेखापाल या पदावर कार्यरत आहे. मागील काही महिन्यांपासून त्याचे त्याच्या शेजारीच राहत असलेल्या चुलतीसोबत संपत्तीवरून वाद सुरू होते. या वादावरून दोघांमध्ये अनेक वेळा भांडणंही झाली आहेत. रविवारी रात्री त्याची चुलती आपल्या दोन मुलींसह घरी झोपलेली असताना विमलेश आपल्या एका मित्रासह त्यांच्या घरात शिरला. या तिघी गाढ झोपेत असतानाच आरोपीने त्यांच्यावर अॅसिड हल्ला केला आणि आपल्या मित्रासह फरार झाला. हल्ल्यानंतर महिलेने आरडाओरड केली असता आजूबाजूचे शेजारी तिच्या घरी जमले. शेजाऱ्यांनी तातडीने महिला आणि तिच्या मुलींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. शेजाऱ्यांनीच या प्रकारची माहिती पोलिसांना दिली.

दरम्यान, पोलिसांनी आरोपी विमलेश याला अटक केली असून याप्रकरणातील आणखीन एक आरोपी फरार आहे. पोलीस फरार आरोपीचा शोध घेत आहे.