
करचोरीविरोधात नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडय़ात कारवाईचा धडाका लावून आयकर खात्याने तब्बल 3300 कोटींच्या हवाला रॅकेटचा पर्दाफाश केल्याची माहिती केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) सोमवारी दिली. मुंबई, पुणे, दिल्ली, हैदराबाद, आग्रा, गोवा या प्रमुख शहरांसह देशभरात 42 ठिकाणी आयकर खात्याने धाडींचा सपाटा लावला. बांधकाम क्षेत्रातील मोठय़ा ग्रुपशी या हवाला रॅकेटचे कनेक्शन असल्याचे आयकर खात्याच्या निदर्शनास आले आहे.
बांधकाम क्षेत्रातील बडय़ा ग्रुपकडून मोठय़ा प्रमाणावर करचोरी केली जात असल्याची माहिती मिळताच आयकर खात्याने धडाकेबाज कारवाईची मोहीम हाती घेतली. छापासत्रादरम्यान करचोरीचे भक्कम पुरावे सापडले आहेत. खोटी कंत्राटे आणि बिलांच्या माध्यमातून 3300 कोटींचा व्यवहार केला गेल्याचे पुरावे आमच्या हाती लागले आहेत, अशी माहिती सीबीडीटीच्या अधिकाऱयांनी सोमवारी दिली. बांधकाम क्षेत्रातील बडय़ा कंपन्यांचे हवाला व्यवहार करणाऱयांशी असलेले साटेलोटे चव्हाटय़ावर आल्याचेही अधिकाऱयांनी स्पष्ट केले.
गरीब लोकांच्यागृहप्रकल्पांत करचोरी
एण्ट्री ऑपरेटर्स, दलाल आणि हवालाचा बेकायदेशीर धंदा करणाऱयांनी सार्वजनिक बांधकाम प्रकल्पांमध्ये वापरण्यात येणाऱया रकमेत फेरफार केला. संबंधित कंपन्यांनी दक्षिण हिंदुस्थानात आर्थिक उत्पन्न कमी असलेल्या म्हणजेच गरीबांसाठी उभारण्यात येणाऱया गृहप्रकल्पांत करचोरीचा मोठय़ा प्रमाणावर गोलमाल केल्याचे आयकर खात्याच्या कारवाईत उघड झाले आहे.
























































