नव्या वर्षात अंधेरी रेल्वे स्टेशनमधील गर्दीची कोंडी फुटणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 रेल्वेमंत्र्यांनी मेट्रोशी जोडलेल्या घाटकोपर आणि अंधेरी रेल्वे स्थानकातील प्रवाशांच्या सकाळ – संध्याकाळ होणाऱया कोंडीवर उपाय शोधण्याचे आदेश दिल्यानंतर पश्चिम रेल्वे अंधेरी रेल्वे स्थानकाचा कायापालट करण्याची मोठी योजना आखली आहे. त्यानुसार अंधेरी पश्चिमेला नवा ‘एलिवेटेड डेक’ बांधण्याची महत्त्वाकांक्षी योजना पश्चिम रेल्वेने आखली आहे. तसेच नवा पादचारी पूल -स्कायवॉकशिवाय अंधेरी स्थानकाच्या फलाट क्र. 6 व 7च्या प्रवाशांची कोंडीतून सुटका करण्यासाठी 8 मीटरच्या पायऱयाही देण्यात येणार आहेत.

रेल्वेमंत्र्यांनी दखल घेतल्यानंतर पश्चिम रेल्वेने अंधेरी रेल्वे स्थानकाची दोन महिन्यांपूर्वी स्वतंत्रपणे ‘शिरगणती’केली होती. त्यात अंधेरी रेल्वे स्थानकात तब्बल 13 लाख प्रवाशांची रोज ये-जा होत असल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली होती. अंधेरी रेल्वे स्थानकाच्या पूर्वेला नवा स्कायवॉक बांधण्याची योजना पश्चिम रेल्वेने आखली आहे. याला पूर्वेकडील दोन पादचारी पुलांना जोडण्याची योजना आहे. त्यामुळे अंधेरी स्थानकातील कोंडीवर ‘उतारा’ मिळणार आहे.

अंधेरीत मे महिन्यात 6 कोटींचा स्कायवॉक!

मेट्रोमुळे अंधेरी स्थानकातून ‘इंटरचेंज’ पॉइंटमुळे गर्दी वाढतच आहे. त्यामुळे अंधेरी पूर्वेला 110 मीटर लांबीचा आणि 6 मीटर रुंदीचा नवा स्कायवॉक बांधला जाणार आहे. अंधेरीत दक्षिणेला नवा पादचारी पूल बांधून नव्या पादचारी पुलाला सध्याच्या पादचारी पुलाशी जोडण्यासाठी हा स्कायवॉक बांधला जात आहे. त्याकरिता सहा कोटी रुपयांचा अंदाजित खर्च येणार आहे.

जानेवारीपासून कोंडीतून सुटका

अंधेरी रेल्वे स्थानकातील गर्दी कमी करण्यासाठी आखलेल्या योजनेत अनेक पायाभूत सुविधांवर काम केले जात आहे. त्यात फलाट 6 आणि 7 येथील पादचारी पुलांच्या पायऱयांवर होणारी कोंडी कमी करण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी अंधेरी दक्षिणेला नवा पादचारी पूल बांधला जाणार आहे. त्याच्या उत्तरेला दोन पायऱया दिल्या जाणार आहेत. दोन मीटरच्या पायऱया तसेच 4.5 मीटरच्या दोन पायऱया मिळून एकूण 6.5मीटर अधिक जुना पादचारी पूल तोडून आणखी 2 मीटरची आणखी एक पायरी अशा मिळून 8.5 मीटर एकूण पायऱयांची लांबी होणार आहे. त्यामुळे नवीन वर्षाच्या जानेवारी महिन्यापासून प्रवाशांची कोंडीतून सुटका होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

50 कोटींचा एलिवेटेड डेक

अंधेरीत पश्चिमेला जसा ‘एलिवेटेड डेक’ बांधला आहे. तसा डेक पूर्वेला बांधण्याची महत्त्वाकांक्षी योजना पश्चिम रेल्वेने आखली आहे. परंतु याचे डिझाइन तयार करण्यापासून ते त्यासाठी जागा मिळविणे हे मोठे जिकिरीचे काम असल्याचे एका अधिकाऱयाने सांगितले.