न्यूमोनियामुळे दर 39 सेकंदाला एका बालकाचा मृत्यू,हिंदुस्थान जगात दुसऱया क्रमांकावर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

न्यूमोनियावर प्रभावी औषधे उपलब्ध असूनही हिंदुस्थानात 2018 मध्ये पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या 1 लाख 27 हजार बालकांचा मृत्यू झाला आहे. न्यूमोनियामुळे होणाऱया मृत्यूच्या प्रमाणात हिंदुस्थान जगात दुसऱया क्रमांकावर असून दर 39 सेकंदाला एक बालक न्यूमोनियामुळे जीव गमावत आहे. संयुक्त राष्ट्रने नुकत्याच प्रकाशित केलेल्या अहवालात ही बाब समोर आली आहे.

संयुक्त राष्ट्र बालकोशने (युनिसेफ) दिलेल्या माहितीनुसार जागतिक स्तरावर 2018 या वर्षात पाच वर्षांखालील आठ लाख बालकांचा न्यूमोनियामुळे मृत्यू झाला. यातील सर्वाधिक बालकांचे वय हे दोन वर्षांपेक्षा कमी होते, तर 1 लाख 53 हजार बालकांचा मृत्यू हा जन्माच्या पहिल्याच महिन्यात झाला आहे. न्यूमोनियामुळे सर्वाधिक मृत्यू हे नायजेरियामध्ये झाले आहेत.

गरिबी न्यूमोनियाचे एक प्रमुख कारण

गरिबी हे न्यूमोनियाचे एक प्रमुख कारण आहे. शुद्ध पिण्याच्या पाण्याची कमतरता, आरोग्यविषयी दुर्लक्ष, पोषण आहाराची कमी तसेच वायुप्रदूषण ही न्यूमोनिया होण्याची प्रमुख कारणे आहेत. न्यूमोनियामुळे होणारे सर्वाधिक मृत्यू याचे एक प्रमुख कारण म्हणजे वायुप्रदूषण आहे.

पाच वर्षे वयात होणाऱया एकूण मृत्यूमध्ये 15 टक्के मृत्यू हे न्यूमोनिया या आजारामुळे होतात.