
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली जिल्ह्याचा दौरा करत शेतकऱ्यांशी संवाद साधला. परतीच्या पावसाने केलेल्या नुकसानाबाबत त्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेत त्यांना धीर दिला. पण, साताऱ्यातील काटेवाडी गावात एक विलक्षण प्रसंग घडला. राजकीय भूमिका रोखठोकपणे मांडणाऱ्या आणि विरोधकांचा सणसणीत पद्धतीने समाचार घेणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी एका लेकीचा हट्ट पित्याच्या मायेने पुरवला.
साताऱ्यातल्या काटेवाडी गावात उद्धव ठाकरे शेतकऱ्यांशी संवाद साधण्यात व्यग्र होते. तेव्हा तिथे एका शेतकऱ्याची मुलगी जमलेल्या गर्दीतून वाट काढत पुढे जाऊ पाहत होती. मला साहेबांना भेटायचंच आहे, असं म्हणत ती उद्धव ठाकरे यांच्या गाडीजवळ आली. मात्र, सुरक्षारक्षक तिला पुढे जाऊ देत नव्हते. गर्दीत चेंगरण्याच्या भीतीने अनेकांनी तिला पुढे न जाण्याचा सल्ला दिला. मात्र, तिने ‘मला चेंगरू दे, पण तरी साहेबांना भेटायचंच आहे’, असा हट्ट सुरूच ठेवला. तिची धडपड पाहून उद्धव ठाकरे यांनी तिला जवळ बोलवलं आणि तिची विचारपूस केली. त्यावर तिने आपलं नाव कांचन असं असल्याचं सांगत त्यांना आपल्या घरी चलण्याचा आग्रह केला. उद्धव ठाकरे यांनी तिची समजूत घालायचा प्रयत्न केला, मात्र तिचा ‘मी तुम्हाला जाऊ देणार नाही, तुम्ही माझ्या घरी चला’, असा हट्ट कायम होता. अखेर कांचनचं मन राखत उद्धव ठाकरे यांनी तिला आपल्याच गाडीत बसवलं आणि तिच्या घरी पोहोचले.
कांचनच्या घरी पोहोचल्यानंतर उद्धव ठाकरे यांचं पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आलं. तिच्या घरच्यांनी त्यांचं औक्षण केलं. त्यांच्या आदरातिथ्याने भारावलेल्या उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याशी संवादही साधला. साक्षात शिवसेना पक्षप्रमुख आपल्या घरी आलेला क्षण कैद करावा म्हणून कांचनच्या कुटुंबीयांची फोटोसाठी धडपडही सुरू झाली. उद्धव ठाकरे यांनी सर्वांसोबत फोटोही काढले. कांचनच्या कुटुंबीयांनी उद्धव यांच्या पाया पडायचाही प्रयत्न केला. मात्र, उद्धव यांनी त्यांना थांबवलं. शेवटी कांचन आणि तिच्या कुटुंबीयांचा हृद्य निरोप घेऊन उद्धव ठाकरे पुढच्या दौऱ्याला निघाले.


























































