
अनेक वर्षे महिलांना दुय्यमतेची वागणूक दिली गेलेली आहे हे जरी खरे असले तरी पुरुषालाही पुरुषसत्ताकतेमुळे अनेक दुःखांचा सामना करावा लागतोय. बाई अशीच असावी याचे ठोकताळे बांधून आपण बाईवर ज्याप्रमाणे बाईपण लादतो, त्याप्रमाणे पुरुषावरही पुरुषपणाची चौकट लादली गेलीय आणि हे करताना पुरुषांकडून त्यांचा भावना व्यक्त करण्याचा अधिकारच काढून घेतलाय. 19 नोव्हेंबर रोजीच्या पुरुषदिनानिमित्त ही बाजूही समजून घेतली पाहिजे.
महिला दिन म्हटलं की, महिना काय, सहा महिने आधीपासून तयारी करणाऱयांना मी जवळून पाहिलं आहे. मात्र पुरुष दिन साजरा करणं फार दूर, तो असतो हेही अनेकांना माहीत नाही. जे साजरे करतात त्यांचीही थट्टा होताना आपल्याला दिसून येते. आपण जेव्हा समानतेबद्दल बोलतो तेव्हा अनेकदा महिलांना झुकते माप देतो. मग ते का? याचा विचार केल्यानंतर आपल्या लक्षात येते की, जो वर्ग दबलेला, पिचलेला आहे त्याला हात देणं म्हणजेच समानतेचा पुरस्कार करण्यासारखे असते. मात्र समानतेची व्याख्या अनेकांना न समजल्याने आपण महिलांना अधिक झुकते माप देतो असा समज होतो. अनेक वर्षे महिलांचा आवाज दाबून ठेवलेला आहे, त्यांना दुय्यमतेची वागणूक दिली गेलेली आहे हे जरी खरे असले तरी पुरुषसत्ताकतेमुळे पुरुषालाही अनेक दुःखांचा सामना करावा लागतो. बाई अशीच असावी याचे ठोकताळे बांधून आपण बाईवर ज्याप्रमाणे बाईपण लादतो, त्याप्रमाणे पुरुष कसा असावा याचेही ठोकताळे बांधून पुरुषपणाचीही चौकट त्यांच्यावर लादतो. एखाद्या पुरुषाचा आवाज जर बारीक असेल तर इतर पुरुष या पुरुषांशी कसे वागतात हे आपण स्वतः आपल्या आजूबाजूला बघतो. अशा वेळी या पुरुषांना काय वाटते? याचा विचार फारसा होताना दिसत नाही.
‘मर्द को दर्द नही होता’ म्हणत आपण पुरुषांकडून त्यांचा भावना व्यक्त करण्याचा, रडण्याचा अधिकारच काढून घेतो. कित्येक पुरुषांना आपल्या लहान मुलांचे संगोपन करण्यात अधिक रस असू शकतो. मात्र हे काम महिलांचे आहे हे सतत त्यांच्या मनावर बिंबवून त्यांना यात रस वाटू शकतो या शक्यताही नाकारून टाकतो. मग पुरुष पालक सतत ओरडणे, चिडचिड करणे सुरू करतात तेव्हा मुलं त्यांना घाबरतात व पुढे त्या घाबरण्यालाच आदर समजतात. त्यामुळेच आपल्या मुलाला कधीही छातीशी न धरणारे असंख्य वडील आपल्याला आजही सापडतात. या वडिलांना आपण कधी विचारलं का? त्यांना मुलांसोबत खेळावेसे वाटले नाही का? त्यांच्या दंग्याचा भाग व्हावा असे वाटले नाही का? आपल्या मुलांनी येऊन घट्ट मिठी मारावी असे किती वेळा वाटले? या सगळ्यांचा आपण जर आढावा घेतला तर आपल्या लक्षात येते की, हे अनेकदा या वडिलांना वाटून गेलेलं आहे. मात्र वडिलांचा धाक असावा या भ्रमामुळे त्यांना हवं तसं ते मुलांशी वागूच शकले नाही. हा भ्रम कोणी निर्माण केला याचे परिणाम नक्की काय याबाबत मात्र अजूनही हवी तशी चर्चा होताना दिसत नाही.
ठरवून केलेल्या लग्नात अथवा अगदी प्रेमविवाहातही मुलांवर वाढणारा ताण अजूनही आपल्या लक्षात येत नाही. लग्न जमताना मुलगा आपल्यापेक्षा जास्त कमवता हवा, उंचीनेही आपल्यापेक्षा जास्त हवा, गोरा ( हे रंगाचं प्रकरण जसं मुलींच्या बाबतीत आहे तसंच मुलांबद्दलही तशा अपेक्षा आहेतच). मुलांनी आपली पत्नी आर्थिकदृष्टय़ा सक्षम असली तरी एक चांगलं जीवन आपल्या कुटुंबाला देण्याची जबाबदारी मात्र त्या पुरुषावरच टाकली जाते. असे का? हा दृष्टिकोण कितपत योग्य आहे. मुलगी गृहकर्तव्यदक्ष हवी याला ज्या प्रमाणात आक्षेप घेतला जाताना जातो त्या प्रमाणात लग्नसंस्थेनं पुरुषांचे केलेले दमन यावर मात्र बोलले जात नाही हे का? कुटुंबाला आर्थिकदृष्टय़ा सक्षम करायचा भार पुरुषावरच का टाकला जातो? उच्चशिक्षीत पती-पत्नी असतील तर घरात पैसा आणणाची जबाबदारी पत्नीने उचलली तर घरातली कामे आनंदाने करणारा पुरुष किती उच्चशिक्षीत मुलींना चालेल? अशा मुलांची निवड करणाऱया मुलींना किती पालक पाठिंबा देतील ही एक संशोधनाची बाब आपल्यासाठी नक्कीच नाही. या प्रश्नांची उत्तरे आपल्या सर्वांना माहीत आहेत तरीही हे प्रश्न चर्चिले का जात नाहीत? यावर आपण जरा नजर टाकली की, आपल्या लक्षात येते की, पुरुषांच्या हक्कांबद्दल बोलले की, आपल्याला ते स्त्रियांच्या हक्कांच्या विरोधात वाटते. त्याचप्रमाणे महिलांच्या हक्कांबद्दल बोलले की, ते पुरुषांच्या हक्कांच्या विरोधात आहे असेच समजले जाते व त्या सर्व प्रश्नांना चर्चेच स्वरूप न देता संघर्षाचे स्वरूप येते. याचाच अर्थ आपण अजूनही समानतेच्या दिशेने प्रवासच सुरू केलेला नाही.
शहरांमध्ये वाढणारी एक पुरुषांची पिढी आता बदलताना दिसतेय. स्त्रियांना समान वागणूक देत असताना त्यांना सहकार्य करण्याची भूमिका ते घेताना दिसतायत. घरातल्या कामाबरोबरच पालकत्वाचे धडे ते गिरवतायत. जरा उशीर झालाच तर गरमागरम चहा बायकोच्या हातात देताना त्यांना कुठलेही दिव्य केल्याची भावना नसते. ‘‘आर्थिक नियोजनाचे तू बघ, मी घर बघतो’’ असे म्हणणारे पुरुष तुरळक असले तरी त्यांचा स्वर वाढताना दिसून येतो. असं असताना आपण मात्र अजूनही पुरुषांना हवा तसा मदतीचा हात देत नाही. त्यांनाही बदल हवाय. मात्र हा बदल होताना जे सहकार्य अपेक्षित आहे, ते मात्र अजूनही पुरुषांना मिळत नाही. त्यांच्या सहकार्याच्या अपेक्षेला विनोदाचे स्वरूप दिले जाते व त्यांची खिल्ली उडवली जाते. हे बदलायला हवे. कारण बदलू इच्छिणाऱयांना सहकार्य मिळाले तरच ही संख्या वाढणार आहे. महिला दिनाचा पुरस्कार करत जर महिलांचे प्रश्न यानिमित्ताने चर्चिले जातात तर पुरुष दिनाला असे का होत नाही? या प्रश्नाच्या उत्तरातच समानतेचा आपला प्रवास कसा सुरू आहे याचे उत्तर दडलेले आहे. हा प्रवास अधिक सुखकर व्हावा असे वाटत असेल तर केवळ स्त्राrच नाही, तर पुरुष व इतर घटकांचीही चर्चा व त्यांचे प्रश्न समोर येऊन त्यावर समाजातील सर्वांनीच उत्तरे शोधावीत अशी आशा आपण या पुरुष दिनाला करुया.





























































