
‘हिंदुस्थानातील तब्बल 99 टक्के मुस्लीम हे धर्मांतरित आहेत. त्यामुळे राम हे फक्त हिंदूचेच देव नाही तर ते मुस्लीमांसाठी देखील पूज्य आहेत’, असं योगगुरू रामदेव बाबा यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे. अयोध्या निकालावर प्रतिक्रीया देताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
‘राम मंदिर हे प्रत्येक हिंदूचे स्वप्न आहे. ते जगातलं सर्वात सुंदर मंदिर असावं असं मला वाटतं. त्यातून आपल्या संस्कृतीचं दर्शन जगाला घडलं पाहिजे. जसं ख्रिश्चनांसाठी व्हॅटिकन, मुस्लिमांसाठी मक्का, शीखांसाठी सुवर्णमंदिर तसंच हिंदूसाठी अयोध्येतील राम मंदिर असले पाहिजे’, असे रामदेव बाबा यांनी या मुलाखतीत सांगितले.
गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने प्रलंबित रामजन्मभूमीच्या खटल्यावर निकाल सुनावत वादग्रस्त जागा ही रामलल्लाचीच असल्याचे जाहीर केले. तसेच मशिदीसाठी अयोध्येतच पाच एकर वेगळी जागा देणार असल्याचे देखील सांगितले. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यामुळे आता रामलल्ला जन्मस्थानाच्या ठिकाणी राम मंदिर बांधण्याचा रस्ता मोकळा झाला आहे. राम मंदिराच्या उभारणीसाठी स्वतंत्र ट्रस्ट उभारण्याचे आदेश देखील न्यायालयाने दिले आहे.



























































