
झोपमोड केली म्हणून एका सुरक्षा रक्षकाने एका इसमावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना मध्य प्रदेश घडली आहे. या गोळीबारात कबीर तोमर याचा जागीच मृत्यू झाला आहे. आरोपीचे नाव अक्कू शर्मा असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अक्कू शर्मा हा एका खासगी कंपनीत सिक्युरिटी गार्ड म्हणून कार्यरत असून तो रात्रपाळी करून घरी झोपला होता. त्यावेळी कबीर तोमर (वय 25) हा रस्त्यावर जोरजोरात आपल्या पुतण्यावर ओरडत होता. यामुळे वारंवार झोपमोड झालेल्या शर्माने रागाच्या भरात आपली बंदूक उचलली आणि कबीरवर गोळीबार केला. शर्मा याने झाडलेली पहिली गोळी कबीरला न लागल्याने तो त्याच्या जवळ गेला आणि काही इंच अंतरावरूनच पुन्हा गोळी झाडली. ही गोळी मात्र कबीरच्या वर्मी लागली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. गोळीबार केल्यानंतर आरोपी फरार झाला होता.
दरम्यान, फरार आरोपी अक्कू शर्माला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी त्याची चौकशी केली असता तो म्हणाला की, मी रात्रपाळी करून घरी आलो होतो. कबीर याच्या आरडाओरड मुळे वारंवार माझी झोपमोड झाली होती. यामुळे रागाच्या भरात मी त्याच्यावर गोळीबार केला.’
























































