
केवळ तरुणच नव्हे तर प्रौढांनाही मोबाईलवर तासन्तास खिळवून ठेवणाऱया टिकटॉक या मोबाईल ऍप विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. टिकटॉकमुळे मुलांवर वाईट परिणाम होत असून त्यामुळे अश्लील व्हिडीओंही व्हायरल होत आहेत. एवढेच काय तर तरुणांमध्ये आत्महत्येचे प्रमाणदेखील वाढत आहे. म्हणूनच टिकटॉक या मोबाईल ऍपवर बंदी घालावी अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.
हीना दरवेश असे याचिका दाखल करणाऱया महिलेचे नाव असून त्यांनी ऍड. अली काशिफ खान यांच्यामार्फत हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. टिकटॉकमुळे अनेकदा जातीवाचक मुद्दय़ांवर व्हिडीओ प्रसारित करण्यात आले असून यामुळे देशात जातीय दंगे होऊ शकतात. तसेच चीननिर्मित हे मोबाईल ऑप्लिकेशन असून हिंदुस्थानविरोधात हा एक कुटिल डावही असू शकतो असे याचिकेत म्हटले आहे. अशा व्हिडीओंमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर हिंदुस्थानची प्रतिमा मलिन होऊन त्याचा परिणाम देशाच्या विकासावर होत आहे असा दावा या याचिकेत करण्यात आला आहे. या याचिकेवर लवकरच हायकोर्टात सुनावणी होण्याची शक्यता आहे.
























































