‘क्लाऊड किचन’मध्ये स्विगीने केली 175 कोटींची गुंतवणूक 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऑनलाइन फुड डिलिव्हरी करणारी कंपनी ‘स्विगी’ने ‘क्लाऊड किचेन’मध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. कंपनीने आपल्या रेस्टॉरंट भागीदारांसाठी 1000 हून अधिक क्लाऊड किचेन स्थापित करण्याकरता दोन वर्षांसाठी 175 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. कंपनीने ‘स्विगी अ‍ॅक्सेस’ या उपक्रमातून ही गुंतवणूक केली आहे. तसेच मार्च 2020 पर्यंत 12 नवीन शहरांमध्ये क्लाऊड किचनसाठी अतिरिक्त 75 कोटींची गुंतवणूक करणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे.

14 शहरांमध्ये करणार गुंतवणूक 

मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीने एक दशलक्ष चौरस फूट रिअल इस्टेट जागेत 14 शहांमध्ये गुंतवणूक केली आहे. जेणेकरून कंपनीतील मोठे, मध्यम आणि लहान रेस्टॉरंट भागीदारांना अधिक ठिकाणी आपला विस्तार करता येईल. कंपनीने म्हटले आहे की, क्लाऊड किचेनच्या बाबतीत हिंदुस्थान लवकरच जगात दुसऱ्या क्रमांकाचा देश होईल. स्विगीचे हिंदुस्थानात सर्वाधिक क्लाऊड किचन आहेत. स्विगी न्यू सप्लायचे सीईओ विशाल भाटिया म्हणाले की, ‘मागील 2 ते 3 वर्षांत ऑनलाईन फूड ऑर्डरमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, हिंदुस्थानात रेस्टॉरंट डायनिंग कल्चरमध्ये देखील वाढ झाली आहे. स्विगीने नेहमीच म्हटले आहे की, क्लाऊड किचन हे फूड डिलिव्हरीचे भविष्य आहे.’