संरक्षण मंत्रालयाच्या संसदीय समितीत साध्वी प्रज्ञासिंह आणि फारुख अब्दुल्लाही!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संरक्षण मंत्रालयाच्या संसदीय सल्लागार समितीतील नावांवरून वाद उफाळला आहे. मालेगाव बॉम्बस्फोटांतील आरोपी, खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर तसेच नजरकैदेत असलेले जम्मू-कश्मीरचे नेते फारुख अब्दुल्ला यांना या समितीत घेण्यात आले आहे. यावरून विरोधकांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.

सरकारने संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या नेतृत्वाखाली 21 सदस्यीय सल्लागार समिती तयार केली आहे. या समितीत साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह फारुख अब्दुल्ला यांना घेतल्यामुळे वाद उफाळला आहे. फारुख अब्दुल्ला हे जम्मू-कश्मीरमधून कलम 370 हटवल्यापासून नजरकैदेत आहेत. त्यामुळे ते हिवाळी अधिवेशनातही सहभागी होऊ शकले नाहीत. असे असतानाही संरक्षण मंत्रालयाच्या संसदीय सल्लागार समितीत त्यांची नियुक्ती  झाल्यामुळे विरोधकांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. हिवाळी अधिवेशनातील फारुख अब्दुल्ला यांच्या गैरहजेरीवरून काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी सभागृहात गोंधळ घातला होता.

सरकारने वीर जवानांचा अपमान केला – काँग्रेस

साध्वी प्रज्ञासिंह यांना समितीत घेतल्यामुळे काँग्रेसने मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. अखेर मोदींनी प्रज्ञासिंह ठाकूर यांना मनापासून माफ केले आहे. दहशतवादी हल्ल्यातील आरोपीला संरक्षण मंत्रालयाच्या समितीत जागा देणे हा वीर जवानांचा अपमान आहे. प्रज्ञासिंह यांची नियुक्ती ही देशासाठी दुर्दैवी बाब आहे अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विटरवर नोंदवली.

साध्वी प्रज्ञासिंह या काही दोषी नाहीत!

काँग्रेसच्या टीकेला केंद्रीय कौशल्य विकास राज्यमंत्री अनंतकुमार हेगडे यांनी प्रत्युत्तर दिले. गुन्हेगारांना बक्षीस देण्याची काँग्रेसचीच जुनी परंपरा आहे असा प्रतिहल्ला त्यांनी काँग्रेस प्रवक्ते सुरजेवाला यांच्या ट्विटवर केला. साध्वी प्रज्ञासिंह यांना मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात अजून दोषी ठरवण्यात आलेले नाही. तुरुंगातून ये-जा सुरू असलेल्या नेत्यांची फौज काँग्रेसकडेच आहे असे हेगडे यांनी म्हटले आहे.