
विवाहात निमंत्रण पत्रिकेला महत्त्व असते. स्वस्तातील पत्रिकांपासून शेकडो रुपयांच्या पत्रिका तयार केल्या जातात. हौसेला मोल नसते हेच खरे. अशातच एक आगळी लग्नपत्रिका चर्चेचा विषय ठरली आहे. पर्यावरणपूरक अशी ही लग्नपत्रिका असून त्यातून फुले, फळे, भाज्या फुलणार आहेत. मालवण तालुक्यातील आचरा येथील युवकाने स्वत:च्या लग्नात अनोखा उपक्रम राबवला आहे.
कपिल गुरव हे आचरा येथील प्रसिद्ध रामेश्वर देवस्थानचे पुजारी आहेत. तसेच ते पत्रकार आहेत. 2 डिसेंबर रोजी त्यांचा विवाह आहे. आपल्या लग्नासाठी त्यांनी पर्यावरणपूरक पत्रिका छापून घेतली आहे. ती साध्या कागदापासून बनवलेली आहे. त्या कागदात अंबाडी, लाल माठ, तुळस, झेंडू आणि पालेभाजीचे बियाणे मिसळले आहे. विवाह सोहळा झाल्यानंतर पत्रिका कुठेही टाकण्यापेक्षा परस बागेत किंवा मातीत टाकली की, पत्रिकेचा कागद मातीत मिसळून त्यातील बियाणांमुळे तुळस, झेंडू वा भाजीची रोपं तयार होऊ शकतात.
पर्यावरणपूरक पत्रिकेबद्दल अधिक माहिती देताना कपिल गुरव म्हणाले, मी आचरा रामेश्वर देवस्थानचा पुजारी आहे. देवस्थानात रामेश्वरचरणी पत्रिका ठेवायला अनेक भाविक येतात. पत्रिकेवर देवदेवतांचे फोटो असल्याने त्या कुठेही फेकायला मन धजावत नाही. त्या घरातच कुठे तरी कपाटात, गादीखाली ठेवल्या जातात. पैशांचाही अपव्यय होतो. यावर उपाय शोधताना अनोख्या लग्नपत्रिकेची संकल्पना मला सुचली. आत बियाणे भरलेली स्वतŠच्या लग्नाची पत्रिका बनवून घेतली.
नागपूर, जळगावात साकारली पत्रिका
कपिल गुरव यांनी लग्नपत्रिका नागपूर येथे तयार केली. त्यामध्ये पालेभाज्या आणि झेंडूची बी टाकण्यात आले. थोडय़ा पत्रिका जळगाव येथे केळीचे बीज टाकून केल्या आहेत. नागपूर येथे रस्त्यावर फेकलेले कागद गोळा करून त्यावर पुनर्प्रक्रिया करून कागद तयार केले जातात. या कागदांमध्ये बिया टाकल्या जातात. या कागदावर लग्नाची पत्रिका छापली की लहानशा स्वरूपात का होईना, पर्यावरण संवर्धनाचा उद्देश सफल होतो, असे गुरव यांनी सांगितले.























































