
‘कोण बडा नेता? कोणती ऑफर? कुणी अशी काही ऑफर दिली असेल तर आता वेळ संपली आहे. त्यांनी जो सेल लावला होता तो संपला आहे. शिवसेनेने अत्यंत स्वाभिमानाने निर्णय घेतला असून पुढील पाच वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री असेल. आता कुणी इंद्राचं आसन जरी दिलं तरी ते शिवसेनेला नको आहे’, अशा खणखणीत शब्दात शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजपकडून प्रस्ताव आल्याचे वृत्त फेटाळून लावले आहे.
गुरुवारी दिल्लीत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बैठकांना पूर्ण विराम मिळाला. सकारात्मक चर्चा झाल्यानंतर दोन्ही पक्षात एकमत असल्याचे संयुक्तरित्या घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी स्पष्ट केले. तसेच पुढील निर्णय हा मुंबईत होणार असून शिवसेनेसोबत चर्चा होणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची रात्री मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली. या बैठकीनंतर शुक्रवारी सकाळी संजय राऊत यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं दिली.
उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री व्हावेत ही महाराष्ट्राच्या जनतेची आणि शिवसैनिकांची इच्छा असल्याचे त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले.
राज्यातील सत्तास्थापनेच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे-
- आदित्य ठाकरे यांचे नेतृत्त्व तयार होत आहे, पण आघाडीचं नेतृत्त्व उद्धव ठाकरे यांनीच करावं अशी सर्वांची इच्छा आहे
- आज तिन्ही पक्षाचे नेते एकत्र बैठक करणार आहेत
- उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री व्हावेत हिच इच्छा आहे
- मी फक्त शिवसेनाप्रमुखांचा शिवसैनिक आहे
- आम्हाला कुणाकडून कोणताही प्रस्ताव आलेला नाही
- शिवसेनेने स्वाभिमानाने निर्णय घेतला आहे
- आता कुणी इंद्राचं आसन जरी दिलं तरी ते शिवसेनेला नको
- कुणी ऑफर दिली असेल तर आता वेळ संपली आहे, त्यांनी कुणी जो सेल लावला होता तो संपला आहे
- सर्व जनतेची इच्छा उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री व्हावेत
- महाराष्ट्राला मजबूत कणखर नेतृत्त्व मिळेल
- तिन्ही पक्षांचे एकमत आहे
- पाच वर्षांसाठी शिवसेनेचा मुख्यमंत्री असेल
- दोन दिवसांत निर्णय कळेल
- शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार – संजय राऊत
पक्कं ठरलं! काँग्रेस, राष्ट्रवादीत एकमत; आज शिवसेनेसोबत मुंबईत चर्चा!


























































