
>> स्पायडरमॅन
आपण जेव्हा एखादा एसएमएस पाठवितो तेव्हा आपण कदाचित असे गृहीत धरता की, आपण आणि ज्याला तो संदेश पाठवला आहे, त्यांच्यातील ही माहितीची देवाणघेवाण खासगीच राहते. आपण हा जो विचार करता तिथेच आपण चुकीचे ठरता. खरे तर सत्य हे आहे की, एसएमएस संदेश सुरक्षित नाहीत आणि त्यांच्या या असुरक्षिततेमुळे आपण, आपले मित्र, कुटुंब आणि व्यवसाय यांच्या संदर्भात जी काही चर्चा करता ती अत्यंत असुरक्षित आणि जोखमीची बनलेली असते. अर्थात हा काही तुमचा दोषही नाही. आपल्यापैकी बऱयाच मोबाईलधारकांच्या डिफॉल्ट मेसेज सेवा जुन्या आहेत आणि खरे तर त्यामुळेच त्या आजकाल होणाऱया वेगवेगळ्या सायबर हल्ल्यांच्या मुकाबल्यासाठी कमकुवत आहेत. अर्थात काही मोबाईल सेवादाते आपली ही सेवा अद्ययावत करण्याच्या प्रयत्नात आहेत, पण कदाचित हे फार उशिरा सुचलेले शहाणपण ठरणार आहे. एकटय़ा अमेरिकेमध्ये दररोज सरासरी 6 अब्ज एसएमएस संदेश पाठवले जातात. म्हणजेच हे प्रमाण दरमहा 180 बिलियन तर दरवर्षी 2.27 ट्रिलियन आहे. जगभरात 4.2 अब्ज लोक मजकूर पाठवीत असतात. म्हणजेच आपणदेखील त्यापैकी एक आहोत असे गृहीत धरले. याचा अर्थ असा की, आपण दिवसाला अंदाजे 67 शब्द संदेश रूपाने पाठवत असतो. एसएमएसचा अर्थ शॉर्ट मेसेज सर्व्हिस आहे. ही सेवा आजची सर्वात जुनी आणि सर्वाधिक वापरली जाणारी संदेशन सेवा आहे. यात एमएमएसदेखील (मल्टिमीडिया मेसेजिंग सर्व्हिस) समाविष्ट आहे, जी एसएमएस वापरकर्त्यांना प्रतिमा, ऑडिओ आणि व्हिज्युअल फाइल्ससारख्या मल्टिमीडिया फाइल्स पाठविण्याची सुविधा देते. एसएमएस आणि एमएमएस दोन्ही सेल्युलर नेटवर्क वापरून पाठविले जातात आणि म्हणूनच वायरलेस नेटवर्क आणि वायरलेस कॅरियरची आवश्यकता भासते. याच्या उलट व्हॉट्सऍप, आय मेसेज, फेसबुक मेसेंजर, वुई-चॅट आणि अन्य मेसेजिंग ऍप्स ओटीटी प्रक्रियेचा वापर करतात. ओटीटी म्हणजे ‘ओव्हर द टॉप.’ या सेवेत संदेश प्रसारित करण्यासाठी सेल्युलर नेटवर्कऐवजी इंटरनेट प्रोटोकॉल (आयपी) वापरतात. म्हणजेच हे संदेश इंटरनेट कनेक्शनद्वारे (वायफाय) किंवा मोबाइल इंटरनेट कनेक्शनद्वारे पाठविले जातात, जे अधिक सुरक्षित मानले जाते.





























































