
राज्याच्या उपराजधानीत एका रेस्टॉरंटमध्ये 1 नव्हे तर 3 रोबोट्सची नियुक्ती करण्यात आली आहे. या उपहारगृहाचे नाव रोबो 2.0 असे ठेवण्यात आले आहे. रोबोट सेवक उपहारगृहात येणाऱया पाहुण्यांना सेवा देणार आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदाच हा प्रयोग केला जात असून आता नागपूरकरांना रोबोटची सेवा अनुभवण्याची सुवर्णसंधी लाभली आहे.
जपानसारख्या तंत्रज्ञानात अग्रेसर असलेल्या देशात रोबोट हे वेटर म्हणून काम करताना अनेकांनी बघितले आहे. याच धर्तीवर नागपूरच्या ’रोबो 2.0’ नावाच्या रेस्टॉरंटमध्येदेखील वेटर म्हणून चक्क रोबोटची नियुक्ती करण्यात आली आहे. चेन्नई, बंगळुरू, हैदराबाद, भुवनेश्वरमध्ये असे प्रयोग आधी झाले आहेत. मात्र महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच नागपुरात हा प्रयोग केला जात आहे.
‘रोबो 2.0’ या रेस्टॉरंटमध्ये एकूण 3 रोबोट आहेत. यातील एका रोबोटची किंमत 5 लाख असून जपानवरून हे रोबोट आयात करण्यात आले आहेत. या रोबोटला ऑपरेट करण्यासाठी एक ऍप्लिकेशन तयार करण्यात आले. या ऑप्लिकेशनवरून कमांड दिल्यानुसार हे रोबोट काम करतात.




























































