
मुंबईकरांना 500 चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करात सवलत देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी, पुरेसा पाणीपुरवठा, दर्जेदार आरोग्य सुविधांसह मुंबईच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेनेच्या माध्यमातून कटिबद्ध राहणार असल्याचे प्रतिपादन आज मुंबईच्या नवनियुक्त महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले. यामध्ये रेनवॉटर हार्वेस्टिंग, सांडपाणी पुनर्वापर योजना, खड्डेमुक्त रस्ते, ज्येष्ठ नागरिकांकरिता आरोग्यवाहिनी व मुंबईकरांना माफक दरात औषधे उपलब्ध व्हावीत यासाठी जैविक औषधांचे धोरण अशा अनेक सुविधा देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही महापौर पेडणेकर म्हणाल्या.
मुंबईत 2041 पर्यंतची काढती लोकसंख्या 17.24 दशलक्ष इतकी अपेक्षित असून 6424 दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासणार आहे. या पार्श्वभूमीवर गारगाई पिंजाळ व दमण गंगा-पिंजाळ नदी जोड प्रकल्पाद्वारे पाण्याचे स्रोत वाढवण्याचे प्रस्तावित असल्याचे महापौर पेडणेकर यांनी सांगितले. सध्या दिल्लीत वायुप्रदूषणाचा भीषण प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत कायुप्रदूषण टाळण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे असल्याचेही त्या म्हणाल्या. मुंबईकरांमध्ये अवयवदानासाठी जनजागृती करणार असून आगामी वर्षात ही संकल्पना रुजवण्यासाठी प्रयत्न करेन असे त्यांनी म्हटले.
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षलागवड, प्राण्यांच्या उपचारासाठी पुढाकार, प्लॅस्टिकबंदीची कठोर अंमलबजावणी करणार असून महापौर निधीमध्ये भरीव वाढ करण्यासाठी सर्व नागरिक, दानशूर व्यक्ती, सभागृहातील सदस्य आणि कर्मचारी संघटनांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले.
उपमहापौरांना विशिष्ट अधिकार मिळावेत – ऍड. सुहास वाडकर
उपमहापौरांच्या मर्यादित अधिकारांमुळे त्यांच्या कार्यक्षमतेवर मर्यादा येतात. त्यामुळे उपमहापौरांना विशिष्ट अधिकार देण्याची गरज असल्याचे उपमहापौर ऍड. सुहास वाडकर यांनी आपल्या भाषणात सांगितले. यासाठी कायद्यात आवश्यक दुरुस्ती करावी अशा सूचनाही त्यांनी यावेळी पालिका प्रशासनाला केल्या.
मुंबईत वाढलेली वाहतूककोंडी सोडवण्यासाठी स्वतंत्र पार्किंग धोरण राबवण्याची गरज असल्याचे सुहास वाडकर म्हणाले. पालिका शाळांमध्ये आणखी दर्जेदार अत्याधुनिक शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. शिवाय रस्ते, पाणी, आरोग्य सुविधा दर्जेदार देण्याबरोबरच प्लॅस्टिकबंदीची कठोर अंमलबजावणी आणि पर्यावरणरक्षण उपक्रमांकडे विशेष लक्ष देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.





























































