
राज्यात गाव-खेडय़ापर्यंत पोहचलेल्या एसटी महामंडळाच्या परिवहन सेवेमुळे आता ग्रामीण जनतेला स्वस्तात औषधेही मिळणार आहेत. एसटी महामंडळाच्या 26 बस आगारांत स्वस्तातील जेनेरिक औषधाचे स्टॉल उभारण्याची निविदा मंजूर झाली असून नोव्हेंबर अखेर स्वस्तातील औषधे सर्वसामान्यांना उपलब्ध होणार आहेत.
एसटी महामंडळाने साल 2015-16 मध्ये स्वस्तातील जेनेरिक औषधांचे स्टॉल बस स्थानक आणि आगारांमध्ये उभारण्याची योजना आखली होती. त्याकरिता टेंडर प्रक्रिया सुरू झाली होती. परंतु निविदेतील जाचक अटींमुळे त्यास फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर अटी आणि शर्ती शिथिल करून नव्याने टेंडर प्रक्रिया राबविण्यात आली. त्यास यश मिळाले असून एकूण 26 आगारांमध्ये जेनेरिक औषध विक्रीचे स्टॉल लागणार आहेत.
येथे मिळणार जेनेरिक औषधे
एसटी महामंडळाच्या एकूण 26 बस स्थानक आणि आगारांत जनेरिक स्वस्तातील औषधे उपलब्ध होणार आहेत. त्याची नावे पुढीलप्रमाणे आहेत. संभाजीनगर विभागात- सिडको, सिलोड. बुलढाणा विभागात बुलढाणा, चिखली, खामगाव. लातूर विभागात अहमदपूर, किंगाव, लातूर (1), तळेगाव, शिरूर ताजबंद. सोलापूर विभागात बार्शी, सोलापूर, मंगळवेढा, पंढरपूर (नवीन). वर्धा विभागात आर्वी, वर्धा बस स्थानक. परभणी विभागात जिंतूर, बसमत, बीड विभागात तळेगाव. चंद्रपूर विभागात बल्लारपूर, जळगाव, परोळा. नांदेड, मुखेड, नाशिक, निमनी, पुणे- स्वारगेट, सांगली- विटा, नागपूर- मौडा.
























































