
भंडारा जिल्ह्यातील साकोली येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून 24 लाखांची रोख व दीड कोटी रुपयांचे दागिने चोरून नेणाऱ्या मुख्य सूत्रधाराला महिनाभरानंतर जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्याच्याकडून 30 लाख 84 हजार रुपये रोख व 1 कोटी 64 लाख रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
विशेष म्हणजे हा मुख्य सूत्रधार बँकेत रोजंदारी कर्मचारी म्हणून कामाला होता. यातील दुसऱया आरोपीला यापूर्वीच अटक करण्यात आली असून त्याच्याकडून 6 लाखांची रोख व 2 लाख 17 हजारांचे दागिने जप्त करण्यात आले होते. विशाल बोरकर, रा. सेंदूरचाफा असे मुख्य सूत्रधाराचे नाव असून जागेश तरजुले, रा. सेंदूरचाफा असे त्याच्या साथीदाराचे नाव आहे.
विधानसभा निवडणुकीत सर्व यंत्रणा व्यस्त असताना 17 ऑक्टोबरच्या मध्यरात्री साकोलीतील राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या बँक ऑफ इंडियाच्या इमारतीची मागील लोखंडी ग्रील तोडून बँकेच्या सेफ केसमधील ग्राहकांनी तारण ठेवलेले 4 किलो 200 ग्रॅम वजनाचे दागिने, 24 लाख 55 हजारांची रोकड व साडेतीन लाख रुपयांचे इलेक्ट्रॉनिक साहित्य असा एकूण 1 कोटी 93 लाख 5 हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरांनी चोरून नेला होता.






























































