राष्ट्रपती शौर्यपदक विजेत्या निरीक्षकाचा आकस्मिक मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई पोलीस दलातील राष्ट्रपती शौर्यपदक मिळविणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन काकडे (42) यांचा आज चटका लावणारा मृत्यू झाला. नियमितपणे आज सकाळी मरीन ड्राइव्ह येथे जॉगिंगला गेलेल्या काकडे यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. काकडे यांच्या अशा निधनाने पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे.

पुण्याच्या सासवड येथील पांधरे गावचे असणारे नितीन काकडे 96 च्या बॅचचे पोलीस अधिकारी होते. सध्या ते परिमंडळ-2 चे उपायुक्त राजीव जैन यांचे रिडर म्हणून काम करीत होते. काकडे हे उत्कृष्ट धावपटू होते. ते नियमित जॉगिंग व व्यायाम करायचे. मॅरेथॉनमध्ये सहभागी होणारे काकडे येत्या मुंबई मॅरेथॉनची तयारी करीत होते. त्यासाठी ते रोज सकाळी मरीन ड्राइव्ह येथे जॉगिंगला जायचे.

त्यानुसार आजदेखील ते मरीन ड्राइव्हवर जॉगिंगला गेले होते. त्याच वेळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. ते धावता धावता जमिनीवर कोसळले. त्यावेळी तेथे वॉकिंग करणाऱया नागरिकांनी पोलिसांना कळवून काकडे यांना मुंबई रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना दाखल करण्याआधी मृत घोषित केले. ‘26/11’च्या हल्ल्यात ताजमध्ये त्या दहशतवाद्यांना रोखण्यासाठी काकडे यांनी मोलाचे काम केले होते. त्यांच्या या कामाची दखल घेत राष्ट्रपतींनी त्यांना शौर्यपदकाने गौरवित केले होते. काकडे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा, आई, वडील आणि भाऊ असा परिवार आहे.