अजित पवार यांना ब्लॅकमेल केले असावे- संजय राऊत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
sanjay-raut-press-conferenc

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार यांच्या पाठिंब्याने भाजपने महाराष्ट्रात सत्तास्थापन केल्यानंतर शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी भाजपला जबरदस्त फटकारले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात हे छळ कपटाचे राजकारण झालेय, रात्रीच्या अंधारात चोरी दरोडेखोरी झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्राची जनता त्यांना माफ करणार नाही अशा शब्दात राऊत यांनी भाजपला फटकारले. यावेळी त्यांनी अजित पवार यांना ब्लॅकमेल करण्यात आले असावे, लवकरच त्याचा देखील खुलासा होईल असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

‘रात्रीच्या अंधारात चोरी दरोडेखोरी होते. रात्रीच्या अंधारात राष्ट्रपती भवन खोलून त्यांनी महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवट हटवली. हे सगळं मोदींच्या राजवाटीत होतंय याचं आश्चर्य वाटतंय. कितीही चोरी लबाडी करा पण हिंमत असेल तर 30 नोव्हेंबरला बहुमत सिद्ध करून दाखवा. आज सकाळी अजित पवारांसोबत गेलेले आठ आमदारांपैकी पाच आमदार परत आलेयत. त्या आमदारांचे अपहरण झाले असंच म्हणा. गाडीत बसवून त्यांना नेण्यात आले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यातील पाच आमदार परत आलेयत. इतरही परत येतील कदाचित अजित पवारही परत येतील. धनंजय मुंडे, अजित पवार यांना ब्लॅकमेल केले गेले असेल. त्यामुळे त्यांच्याशीही त्यांच्या पक्षातील नेते बोलतील. त्यानंतर त्याचा खुलासा करूच. पण किती लोकांना तुम्ही ब्लॅकमेल करणार, किती लोकांच्या कानपट्टीला बंदूक लावणार ‘,असे संजय राऊत यांनी सांगितले.

यावेळी संजय राऊत यांनी भाजपच्या चंद्रकांत पाटील यांच्यावर देखील जोरदार टीका केली. ‘चंद्रकांत पाटील तुम्ही तुमचं बघा, तुमच्या पक्षाला सांभाळा. हे चोरासारखं जे वागताय ना ते तुम्हाला महाग पडेल. चंद्रकांत पाटलांनी तोंड सांभाळून बोलावं. हा महाराष्ट्र आहे.’अशा शब्दात राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांना फटकारले आहे.