
अलिबाग तालुक्यातील वरसोली येथील लॉजिगचे वीज बिल कमी करण्यासाठी 1 लाख 20 हजाराच्या मागितलेल्या लाचेप्रकरणी पन्नास हजाराचा पहिला हफ्ता स्वीकारताना अलिबाग महावितरणचा कनिष्ठ अभियंता विशाल बागुल (32) याला 22 नोव्हेंबर रोजी सायंकाळी लाचलुचपत विभागाने अटक केली होती. आज जिल्हा न्यायालयात लाचखोर बागुल याला हजर केले असता 27 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तपासात अजून काही जणांची नावे येण्याची शक्यता निर्माण होत आहे.
अलिबाग तालुक्यातील वरसोली येथे तक्रारदार यांचे लॉजिंग आहे. तक्रारदार यांनी लॉजिंगसाठी घरगुती वीज मीटरवरून वीज घेतली होती. वीज मिटरचे बिल तक्रारदार यांनी भरलेही होते. मात्र लॉजिंगसाठी बांधलेल्या रुमसाठी व्यवसायिक वीज मीटर घेतले नव्हते. याबाबत त्यांनी महावितरण विभागाशी संपर्क साधला होता. मात्र महावितरण विभागातील अधिकाऱ्यांनी पावले उचलली नसली तरी महावितरणने तक्रारदार याना व्यावसायिक वीज मीटर नसल्याने 2 लाख 47 हजाराचे दंड आकारणी केली होती. तक्रारदार यांनी याबाबत अलिबाग महावितरण कार्यालयाशी संपर्क साधला.
महावितरणचे कनिष्ठ अभियंता विशाल बागुल यांच्याकडे वरसोलीचा पदभार असल्याने तक्रारदार यांनी बागुल यांची भेट घेतली. त्यावेळी वीज बिल कमी करण्यासाठी बागुल यांनी तक्रारदार यांच्याकडे 1 लाख 20 हजाराची लाचेची मागणी केली. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी रायगड लाच लुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारदार यांनी केलेल्या तक्रारीनुसार लाच लुचपत विभागाने सापळा रचला. अलिबाग चेंढरे येथील कार्यालयात लाचेचा पहिला पन्नास हजाराचा हफ्ता स्वीकारताना कनिष्ठ अभियंता विशाल बागुल यांना रंगेहाथ पकडले.
लाचखोर बागुल यांना शनिवारी लाच लुचपत विभागाने जिल्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 27 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस कोठडीत बागुल यांची चौकशी केल्यानंतर यात अजून काही जण आहेत का याबाबत माहिती बाहेर येऊ शकते. त्यामुळे या लाचखोर प्रकरणात अजूनही महावितरणचे अधिकारी अडकण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.
वरसोली हा परिसर समुद्र किनारी वसलेला असल्याने पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. त्यामुळे याठिकाणी स्थानिकांनी घरगुती लॉजेस व्यवसाय सुरू केले आहेत. त्यामुळे अनेक जण घरगुती वीज मीटरवरून वीज लॉजेसला घेत असतात. या गोष्टीचा फायदा महावितरण विभागाचे अधिकारी घेऊन दंड आकारणी केलेली पुढे येत आहे. त्यामुळे यात अजून किती जणांना बागुल यांनी लुटले आहे का हे पाहणेही गरजेचे आहे.





















































