खड्डे भरण्याच्या कामातील बेजबाबदार कंत्राटदारांना पालिकेची नोटीस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पावसाळ्यात खड्डे भरण्याचे काम दिलेल्या कंत्राटदारांनी निकृष्ट दर्जाचे काम केल्याचे समोर आल्यामुळे पालिकेने अशा कंत्राटदारांना नोटीस बजावली आहे. विशेष म्हणजे कंत्राटदारांना हे खड्डे तातडीने भरण्याचे निर्देश देतानाच दिलेल्या मुदतीत खड्डे भरले नाहीत तर त्यांची अनामत रक्कम जप्त करण्याचा इशाराही पालिकेने दिला आहे.

मुसळधार पाऊस आणि काही ठिकाणी कंत्राटदारांनी केलेल्या निकृष्ट कामामुळे मुंबईकरांना रस्त्यावरील खड्डय़ांमुळे नाहक मनस्ताप सहन करावा लागला होता. या पार्श्वभूमीवर तातडीने खड्डे भरावेत आणि निकृष्ट काम करणार्‍या कंत्राटदारांवर कारवाई करावी अशी जोरदार मागणी नागरिक, नगरसेवकांकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेने निकृष्ट काम करणार्‍या कंत्राटदारांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये मुलुंड येथील रस्त्यांवरील खड्डे भरण्यात बेजबाबदारपणा झाल्याचे समोर आल्यामुळे पालिकेने दोन कंत्राटदारांना नोटीस पाठवली आहे.

 

कंत्राटदारांना 48 तासांची मुदत

मुलुंडमधील बी. पी. क्रॉस रोड क्र. 3, टाटा कॉलनी (पल्लवी सेक्टर), म्हाडा कॉलनी रोड, आर. पी. क्रॉस रोड, टाटा कॉलनी, बी. पी. क्रॉस रोड नंबर चार, जीजीएस रोड, बी. पी. क्रॉस रोड नंबर 1, महाकवी कालिदास रोड, टाटा कॉलनी (इमारत क्र. 13 आणि 14), नवघर गल्ली रोड, आरपीरोड, नाहूर पुलावरील खड्डे भरण्याचे काम निकृष्ट करण्यात आल्याचे समोर आल्याने ही नोटीस पाठवण्यात आली आहे. हे काम पुन्हा करण्यासाठी संबंधित कंत्राटदारांना 48 तासांची मुदत देण्यात आली आहे.