भाजपकडून राष्ट्रपती भवन, राजभवनाचा काळाबाजार, संजय राऊत यांची टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
sanjay-raut-press

‘भाजपला मी व्यापारी समजत होतो. पण त्यांना हा व्यापार जमला नाही. व्यापार सचोटीचा,प्रामाणिकपणाचा केला असता तर आता भेसळीचे पदार्थ विकण्याची वेळ आली नसती. त्यांनी तर राष्ट्रपती भवन व राजभवनाचाही काळाबाजार केला’, अशा शब्दात शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली. संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर निशाणा साधला तसेच जर राज्यपालांनी दहा मिनिटं जरी दिली तरी आम्ही आमचं बहुमत सिद्ध करू असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

‘शरद पवार हे महाराष्ट्राचे, देशाचे नेते आहे. त्यांचा पक्ष फोडून भाजप जर सरकार स्थापन करत असेल तर त्यांचा हा डाव त्यांच्यावर उलटणार आहे. भाजपनं विधानसभा निवडणूकीआधी देखील शरद पवारांचा पक्ष फोडला. विधानसभा निवडणूकीच्या निकालानंतरही ते तेच करत आहेत. पण त्यांनी फोडलेले सर्व आमदार खासदार पडले. त्यांच्या या घाणेरड्या राजकारणाचं उदाहरण म्हणजे कालचा शपथविधी. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली पण महाराष्ट्राच्या जनतेलाच माहित नाही. जर तुमच्याकडे खरंच बहुमत होतं तर मग 30 तारखेपर्यंत का थांबलात. येत्या 24 तासात का नाही बहुमत सिद्ध केलं. का असं अंधारात शपथ घेतलात. 2014 सारखा वानखेडेवर बॅण्डबाजा घेऊन का केला नाही शपथविधी’, अशी टीका देखील त्यांनी या पत्रकार परिषदेत केली.

‘आपल्या राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी एवढा वेळ दिला म्हणजे त्यांनी आमदार फोडण्यासाठीच त्यांना वेळ दिला आहे. हा प्रकार आणीबाणीपेक्षाही वाईट आहे. राज्यपाल भाजपला ४८ तासांची मुदत देतात तर शिवसेनेला व राष्ट्रवादीला 24 तासांची मुदत देतात. हा कुठला न्याय. अजित पवार राज्यपालांकडे खोटे कागदपत्र घेऊन जातात. ते कागदपत्र राज्यपाल तपासतही नाहीत आणि शपथविधी घेतात. आज आम्ही तिन्ही पक्ष सत्ता स्थापनेचा दावा करणार होतो. मात्र भाजपने ज्या प्रकारे सत्तास्थापनेचे डावपेच खेळले, ते अत्यंत घाणेरडे आहे. हा काळादिवस आहे. त्यामुळे इंदिरा गांधींनी आणिबाणी लावली त्याला काळा दिवस म्हणण्याचा, त्यावरून टीका करण्याचा नैतिक अधिकार भाजपने गमावलाय’, अशी टीका संजय राऊत यांनी केला.

दहा मिनिटांत बहुमत सिद्ध करू

‘आमच्याकडे 165 आमदारांचं बहुमत आहे. अजूनही काही आमदर आमच्या संपर्कात आहेत. राज्यपालांनी दहा मिनिटांत बहुमत सिद्ध करण्यासाठी बोलावले. तरी आम्ही ते सिद्ध करू’, असे देखील संजय राऊत यांनी सांगितले.