आपलं सरकार आलं! उद्धव ठाकरे आज घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अखंड हिंदुस्थानाला अभिमान वाटावा असा इतिहास महाराष्ट्रात घडला आहे. सदैव जनसामान्यांची काळजी करणार्‍या, त्यांच्यासाठी जिवाचे रान करणार्‍या शिवसेनेच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले आहे. शेतकरी, कष्टकरी, वारकरी, सामान्य नागरिक असा प्रत्येक जण आनंदाने म्हणतोय…आपलं सरकार आलं. लाटा कापत, वादळे चिरत, संकटे पायदळी तुडवत आपलं सरकार आलं. या सरकारचे कर्णधार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गुरूवारी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. शिवतीर्थावर हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाच्या साक्षीने हा अभिनव सोहळा रंगणार आहे. हा ऐतिहासिक शपथविधी सोहळा ‘याचि देही याचि डोळा’ पाहण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांसह सामान्य नागरिकांचे जथेच्या जथे शिवतीर्थाकडे निघाले आहेत. गुरूवारी सूर्य मावळतीला जात असतानाच महाराष्ट्राच्या राजकारणात एका नव्या युगाची सुरुवात होणार आहे. त्यामुळे अवघ्या देशाचे लक्ष या सोहळ्याकडे लागले आहे.

देशातील विविध राज्यांचे मुख्यमंत्री, मंत्री आणि महत्त्वाच्या व्यक्ती या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. या ऐतिहासिक घटनेला शोभेल अशी जय्यत तयारी शिवतीर्थावर झाली आहे. या सोहळ्यासाठी लाखोंचा जनसागर लोटणार आहे. महाराष्ट्र आणि देशाच्या कानाकोपर्‍यातूनच नव्हे तर जगभरातून प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी या सोहळ्याचे वृत्तांकन करण्यासाठी मुंबईत दाखल झाले आहेत. त्यासाठी पोलिसांनीही चोख बंदोबस्त ठेवला आहे. हजारो पोलीस बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आल्याने शिवतीर्थाला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन!

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गुरूवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन करून त्यांचे खास अभिनंदन केले आणि शुभेच्छाही दिल्या. उद्धव ठाकरे यांनी यावेळी पंतप्रधान मोदी यांना शिवतीर्थावर होणार्‍या शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण दिले.