
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी वैयक्तिक कारणासाठी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर भाजपचे सरकार कोसळले. पण अजित पवार यांनी नेमक्या कोणत्या कारणासाठी राजीनामा दिला याचे औत्सुक्य प्रसिद्धीमाध्यमांमध्ये कायम आहे. याबाबत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी छेडले असता त्यांच्या पाठिंब्याबाबत योग्य वेळी बोलेन, असे सांगत फडणवीस यांनी काढता पाय घेतला.
विधान भवनात आमदारांच्या शपथविधीच्या निमित्ताने पत्रकारांनी फडणवीस यांना अजित पवार यांनी सरकार स्थापन करण्यासाठी दिलेल्या पाठिंब्याबाबत विचारले. सरकार स्थापन करण्यासाठी आपण अजित पवार व राष्ट्रवादीची साथ का घेतली, असा सवाल फडणवीस यांना केला असता ते म्हणाले, चिंता करू नका. त्यांच्या पाठिंब्याबाबत योग्यवेळी बोलणार असे सांगत त्यांनी अजित पवारांनाही सूचक इशारा दिला.

























































