
हिंदुस्थानच्या तृतीय मानांकित किदाम्बी श्रीकांतने सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी दिली. याचबरोबर फ्रान्सचा लुकास कोरवी कोर्टवर न उतरल्याने पारुपल्ली कश्यपला पुढे चाल मिळाली, तर फ्रान्सच्या थॉमस राउक्सेलविरुद्धही 18 वर्षीय लक्ष्य सेनला सलामीला बाय मिळाला.
श्रीकांतने रशियाच्या ब्लादीमिर मालकोव याचा 36 मिनिटांपर्यंत चाललेल्या लढतीत 21-12, 21-11 असा सरळ गेममध्ये पराभव करत दुसर्या फेरीत प्रवेश केला. मागील दोन वर्षांपासून श्रीकांतने एकही किताब जिंकलेला नाही. दुखापतीमुळे तो प्रदीर्घ काळापासून आऊट ऑफ फॉर्म आहे. श्रीकांतने या वर्षी इंडिया ओपनच्या फायनलमध्ये धडक मारली होती, मात्र त्यानंतर तो प्रत्येक स्पर्धेत सातत्याने अपयशी ठरला. मागच्या आठवडय़ात हाँगकाँग ओपनमध्ये आठ महिन्यांनंतर श्रीकांतने उपांत्य फेरी गाठली होती, मात्र त्याला जेतेपदापर्यंतचा प्रवास करता आलेला नाही.

























































