
औसा शहरातील बँक कॉलनीत 11 वर्षीय प्रथमेश प्रदिप खंदाडे हा मुलगा एका जुन्या 40 फूट खोल विहिरीलगत असलेल्या बोराच्या झाडाची बोरे काढण्याच्या नादात त्याच्याजवळ असलेल्या विहिरीत काल संध्याकाळी चार वाजण्याच्या सुमारास पडला. विशेष बाब, या विहिरीलगत असलेल्या घरातील कोणालाही याचा थांगपता नव्हता.
गुरुवारी संध्याकाळी चार वाजल्यापासून प्रथमेश घरातून गायब झाल्याने त्याच्या कुटुंबियांनी शोध घेतला, पण शुक्रवारी सकाळी अकरा वाजल्यापासून संशय आल्याने विहिरीतील पाणी उपसले असता प्रथमेशचा मृतदेह आढळला. या घटनेने मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. औसा पोलीस अधिक तपास करत आहेत. यापूर्वीसुद्धा याच विहिरीमध्ये किमान पाच ते सात जणांना त्यांचा जीव गमवावा लागला आहे, अशी चर्चा आहे. दाट वस्तीत असलेल्या विहिरी भोवती संरक्षक कठडा औसा नगर पालिकेने बांधावा, अशी मागणी नागरिकातून होत आहे.





























































