बीएसएनएलने व्हीआरएस योजना जाहीर करताच त्याला कर्मचाऱयांचा जोरदार प्रतिसाद मिळाला. पण यामुळे या कंपनीची टेलिकॉम सेवा पूर्णपणे ढेपाळली असून कर्मचाऱयांची ही कमतरता भरून काढण्यासाठी किमान 200 आयटीएस अधिकाऱयांची नेमणूक करण्याची मागणी कंपनीने दूरसंचार विभागाकडे केली आहे.
बीएसएनएलमध्ये काम करण्यासाठी इतर कंपन्यांमधून सध्या 550 आयटीएस अधिकारी कार्यरत आहेत. पण आता एक तर ते आपल्या आधीच्या कामावर जाण्यास किंवा अन्यत्र कामाला जाण्यास प्रवृत्त होऊ लागले आहेत. याबाबत बोलताना बीएसएनएलचे मानव संसाधन संचालक अरविंद वडनेरकर म्हणतात की, कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पी. के. पुरवार यांनी व्हीआरएस योजना जाहीर केल्यावर लगेचच दूरसंचार विभागाकडे 200 आयटीएस अधिकाऱयांची मागणी केली आहे. कंपनी सध्या संकटात आहे. त्यातच आपले ग्राहक टिकवून ठेवण्याचे दिव्यही त्यांना करावे लागत आहे.
व्हीआरएसची गरजच नव्हती
बीएसएनएल कंपनी सध्या डबघाईला आली आहे. ती मोठय़ा आर्थिक संकटात सापडली आहे. अशा परिस्थितीत कंपनीने व्हीआरएस योजना आणण्याची काय गरज होती, असा सवाल आयटीएस असोसिएशनचे अध्यक्ष पी. के. जैन यांनी उपस्थित केला आहे. नव्या अधिकाऱयांची मागणी करण्यापेक्षा 803 वरिष्ठ अधिकाऱयांमधील ज्या 458 अधिकाऱयांनी व्हीआरएस घेतली आहे त्यांना कायम ठेवता आले असते, असेही त्यांनी पुढे स्पष्ट केले.






















































