
नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून पूर्वोत्तर राज्यांमध्ये चौथ्या दिवशीही भयंकर हिंसाचार झाला. त्रिपुरातील परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली असून , पोलिसांनी केलेल्या गोळीबारात तीन आंदोलकांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. दंगलीची सर्वाधिक झळ आसामला पोहोचली असून, गुवाहाटीत संचारबंदी मोडून लोक रस्त्यावर उतरले. दिब्रुगडमध्ये आंदोलकांनी रेल्वे स्थानक पेटवले. दरम्यान, दंगलीचा वणवा पेटलेल्या राज्यांमध्ये इंटरनेटबंदी 48 तासांनी वाढवण्यात आली आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पाकिस्तान, अफगाणिस्तान तसेच बांगलादेशातील अल्पसंख्यांकांना नागरिकत्व बहाल करणारे नागरिकत्व दुरुस्ती विधेयक संसदेत मंजूर झाले. मात्र देशभरात या विधेयकाला कडाडून विरोध होत आहे. पूर्वोत्तर राज्यांमध्ये हा विरोध अधिक तीक्र आहे. नॉर्थ ईस्ट स्टुडंट ऑर्गनायझेशनच्या नेतृत्वाखाली पुकारण्यात आलेल्या या आंदोलनात 30 संघटना सहभागी झाल्या आहेत. आसाम, मणिपूर, त्रिपुरा, मिझोरम, अरुणाचल तसेच मेघालय या राज्यांमध्ये आंदोलनामुळे जनजीवन पूर्णतः ठप्प झाले आहे.
आसामात लष्कर तैनात
आसामातील दहा जिल्हय़ांत अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू करण्यात आली असून, बंदोबस्तासाठी लष्कर तैनात करण्यात आले आहे. गुवाहाटीत संचारबंदी मोडून हजारो लोक रस्त्यावर उतरले. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला, अश्रुधुराच्या नळकांडय़ा फोडल्या. मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. आंदोलकांनी ठिकठिकाणी जाळपोळ केली. अनेक वाहनांची मोडतोड करण्यात आली. परिस्थिती हाताळण्यात अपयश आल्याचा ठपका ठेवून आसामचे अतिरिक्त पोलीस महासंचालक मुकेश अग्रवाल व गुवाहाटीचे पोलीस आयुक्त दीपककुमार यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. दीपककुमार यांच्या जागेवर मुन्नाप्रसाद गुप्ता यांना आणण्यात आले आहे. दिब्रुगडमध्ये उडालेला हिंसाचाराचा भडका चौथ्या दिवशीही धुमसत होता. मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्या या जिल्हय़ात आंदोलकांनी रेल्वेस्थानक पेटवून दिले. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने आसाम व त्रिपुरात जाणाऱया सर्व गाडय़ा रद्द केल्या आहेत. इंडिगो, स्पाईसजेट, विस्तारा, गोएअर या विमान कंपन्यांनी या दोन्ही राज्यांतील उड्डाणे रद्द केल्याचे सांगण्यात आले.
आसामी दिग्दर्शकांचा फिल्मफेअरवर बहिष्कार
आसामात रणजी क्रिकेटचे सामने चालू आहेत. मात्र दंगलीचा भडका उडाल्याने चार दिवसांपासून एकही सामना झालेला नाही. आज पुढील सर्व सामने रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले. फेब्रुवारीमध्ये होणाऱया फिल्मफेयर पुरस्कारातून आसामी दिग्दर्शकांनी आपले चित्रपट मागे घेतले आहेत.
मोदी-शिंजो भेटीवर दंगलीचे सावट
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांची रविवारी गुवाहाटीत भेट होणार असून, त्यांच्यात द्विपक्षीय चर्चा होणार आहे. मात्र गेल्या चार दिवसांपासून आसामात उसळलेल्या दंगलीचे सावट या भेटीवर पडले आहे.
आसाम, त्रिपुरात राज्यभर संचारबंदी
दंगलीची सर्वाधिक झळ आसाम व त्रिपुरा या दोन राज्यांना बसली आहे. या दोन्ही राज्यांत बहुतेक जिल्ह्य़ात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. आसामची राजधानी गुवाहाटीत संचारबंदी मोडून लोक रस्त्यावर उतरले. आंदोलकांनी भयंकर जाळपोळ तसेच तोडफोड केली. त्रिपुरात परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यामुळे पोलिसांनी गोळीबार केला. यात दोन जण ठार तर 11 जखमी झाले. मुख्यमंत्री बिप्लव देव यांनी आंदोलकांना शांततेचे आवाहन केले. मात्र त्याचा काहीही परिणाम झाला नाही. राज्यात आजही ठिकठिकाणी जाळपोळ करण्यात आली.
साहित्यिक शिरीन दळवी पुरस्कार परत करणार
प्रसिद्ध उर्दू पत्रकार आणि साहित्यक शिरीन दळवी राज्य साहित्य अकादमी पुरस्कार परत करणार आहेत. नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला निषेध व्यक्त करताना त्यांनी हा निर्णय घेतला आहे. नागरिकत्व दुरुस्ती विधेयक हा आपल्या राज्यघटनेवर, धर्मनिरपेक्षतेवर हल्ला आहे, असे शिरीन यांनी म्हटले आहे. हे माझ्यासाठी खूप धक्कादायक आणि दुःखदायक आहे. हा देशाची राज्यघटना आणि धर्मनिरपेक्षतेवर हल्ला आहे. लोकशाही आणि धर्मनिरपेक्षतेच्या पक्षात लढणाऱया माझ्या समुदाय आणि सहकाऱयांना साथ देण्यासाठी मी हा पुरस्कार परत करत असल्याच्या शब्दांत शिरीन यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

























































