
सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या कुडाळ जिल्हा परिषद गटाच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने भाजप पुरस्कृत उमेदवाराचा दारूण पराभव करत विजयाची नोंद केली. राष्ट्रवादीचे दीपक पवार यांनी या निवडणुकीत भाजप पुरस्कृत उमेदवार मालोजी शिंदे यांचा 5 हजार 488 मताधिक्याने पराभव केला.
राष्टृवादीचे प्रदेश उपाध्यक्ष, माजी आमदार शशिकांत शिंदे यांनी कुडाळमध्ये विशेष लक्ष घातल्याने सातारा – जावलीचे भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. दीपक पवार यांना 9923, तर मालोजी शिंदे यांना 4434 मते मिळाली. माजी आमदार शशिकांत शिंदे यांनी जुन्या जावली मतदारसंघाचे दहा वर्षे प्रतिनिधीत्व केले होते. मतदारसंघ पुनर्रचनेनंतर शिंदे यांना राष्ट्रवादीने कोरेगावातून रिंगणात उतरवले. त्या ठिकाणी दहा वर्षे प्रतिनिधित्व केल्यानंतर विधानसभा निवडणुकीत त्यांचा अनपेक्षित पराभव झाला. त्यानंतर आपल्या होमपीचवर ते सक्रीय झाल्याने जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीत अप्रत्यक्षरीत्या शिंदे व आमदार भोसले यांच्यात हा सामना रंगला होता.
यापूर्वी दीपक पवार हे कुडाळ गटाचे भाजपचे सदस्य होते. मात्र विधानसभा निवडणुकीपूर्वी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी जिल्हा परिषद सदस्यपदाचा राजीनामा देऊन दीपक पवार यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करून सातारा – जावलीतून विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र निवडणुकीत शिवेंद्रराजे यांचा विजय झाला. त्यानंतर कुडाळच्या पोटनिवडणुकीत दीपक पवार उतरल्याने मोठी चुरस निर्माण झाली होती.
शशिकांत शिंदे हे जावलीचे भूमिपुत्र असल्याने त्यांच्याविषयीची सहानुभूती या ठिकाणी मतदानात दिसून आली. शशिकांत शिंदे होमपिचवर सक्रीय झाल्याने आमदार शिवेंद्रराजे भोसले अधिक सावध झाले होते. त्यामुळे त्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. परंतु मालोजी शिंदे यांच्या दारूण पराभवामुळे भाजपला धक्का बसला आहे.



























































