
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या वर्षा नाइट क्लब गँगने भाजपच्या दिग्गज नेत्यांविरोधात कटकारस्थाने रचून त्यांना बाजूला केले. रोज रात्री वर्षा बंगल्यावर ही गँग आणि फडणवीस यांच्यात खलबते व्हायची. तिथेच पंकजा मुंडे, एकनाथ खडसे यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांविरोधात षड्यंत्र रचले गेले असा आरोप गोटे यांनी केला आहे.
12 डिसेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या गोटे यांनी देवेंद्र फडणवीसांवर अक्षरशः हल्लाबोल केला आहे. तत्कालीन मंत्री गिरीश महाजन यांच्यासह जयकुमार रावल, प्रसाद लाड, प्रवीण दरेकर, राम कदम वर्षा बंगल्यावर रोज रात्री फडणवीस यांची भेट घ्यायचे. यावेळी भाजपच्या दिग्गज नेत्यांविरोधात कटकारस्थाने शिजली असा आरोप गोटे यांनी केला आहे. शनिवारी गोटे यांनी वार्ताहरांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात संताप व्यक्त केला. गोपीनाथ गडावर दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित मेळाव्यात भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे यांनी आपल्यातील असंतोषाला वाट मोकळी करून दिली होती. फडणवीस यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. खडसे यांनी जळगाव जिल्ह्यातून मुलगी रोहिणी खडसे यांच्या झालेल्या पराभवाला काही भाजप नेते जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला होता.
फडणवीस यांच्या गँगमुळेच राज्यात पक्षाला बुरे दिन
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वर्षा नाइट क्लब गँगमुळेच राज्यात भाजपला बुरे दिन आल्याचा आरोप अनिल गोटे यांनी केला. एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, प्रकाश मेहता, राज पुरोहित आणि अनेक नेत्यांना बाजूला करण्यात आले, तर गिरीश महाजन, जयकुमार रावल, प्रसाद लाड, प्रवीण दरेकर, राम कदम आणि अनेक नेत्यांना संधी दिली गेली, त्यांना पुढे करण्यात आले. हे सर्व नेते वर्षा बंगल्यावर रोज रात्री 10 वाजल्यानंतर एकत्र येत आणि भाजपच्या दिग्गज नेत्यांविरोधात कटकारस्थाने रचत असत. या षड्यंत्राचा मीदेखील बळी ठरल्याचे गोटे यांनी म्हटले आहे.






















































