
राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) आणि नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात (सीएए) देशभरात भडका उडाला आहे. देशाची भावी पिढी रस्त्यावर उतरली आहे. नवी दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया (जेएमआय) आणि अलिगढ मुस्लिम विद्यापीठात या कायद्याविरोधात निदर्शने करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी रविवारी अमानुष लाठीमार केला. त्याचे पडसाद देशभरात उमटले. अनेक शिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलने छेडली. या आंदोलनाचे लोण मुंबईतही पसरले. पवईतील आयआयटी मुंबई, टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्सेस (टिस) आणि मुंबई विद्यापीठातही हजारो विद्यार्थी आणि नागरिकांनी या पोलिसी क्रौर्याबद्दल तीव्र संताप व्यक्त करत निदर्शने केली.
जेएमआयमधील पोलिसी क्रौर्याचा निषेध करण्यासाठी विविध विद्यार्थी संघटनांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आज कालिना येथील मुंबई विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ निदर्शने केली. एनआरसी आणि सीएए कायदे आणून केंद्र सरकार समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप आंदोलक संघटनांनी यावेळी केला. मुस्लिम समाजाविरोधात असलेल्या या कायद्याचा देशातील बहुसंख्य हिंदूही निषेध करत आहेत असे सांगतानाच जेएमआयमधील विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या राक्षसी कारवाईबद्दल विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला.

एनआरसी आणि सीएए कायद्याविरोधात पूर्वोत्तर राज्ये पेटली आहेत. रविवारी जेएमआयमधील विद्यार्थ्यांनी या कायद्यांचा लोकशाही मार्गाने निषेध नोंदवला होता, पण दिल्ली पोलिसांनी जेएमआयमध्ये घुसून निष्पाप विद्यार्थ्यांना पकडून मारहाण केली. लायब्ररीमध्ये अभ्यास करत बसलेल्या आणि अगदी जामिया मशिदीत नमाज पढणाऱ्या विद्यार्थ्यांनाही खेचून बाहेर आणत मारहाण केली गेली. पोलिसांच्या लाठीमारात गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना उपचाराविना अनेक तास पोलीस ठाण्यात बसवून ठेवले गेले असा आरोप यावेळी स्टुडंटस् इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडियाच्या राफिद शहाब यांनी केला. या आंदोलनात छात्रभारती संघटनेसह एसएफआय, टीस स्टुडंटस् युनियन, एनएसयूआय, महाराष्ट्र स्टुडंटस् युनियन, सीवायएसएस, एआयएसएफ, जेएसी, पीएसयू, एआयपीसी, एसआयओ, राष्ट्रवादी विद्यार्थी संघटना आदी संघटना सहभागी झाल्या होत्या. पोलिसांनी विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार केले, बसेस जाळल्या आणि विद्यार्थ्यांवर हल्ले करण्यासाठी गुंडांचा वापर केला, असेही आरोप होत आहेत.
सरकार विद्यार्थ्यांना का घाबरत आहे असा सवाल करतानाच छात्रभारती राष्ट्रीय संघटनेचे सचिन बनसोडे यांनी वरील दोन्ही कायदे हे धर्मनिरपेक्षतेच्या विरोधात असून देश तोडण्यासाठी आणले गेले आहेत असा आरोप केला. हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा घटनेविरुद्धचा अजेंडा आहे, असेही ते म्हणाले. सीएए कायदा रद्द करावा अशीही मागणी यावेळी आंदोलकांनी केली. देशातील जनता अशा फाळणीच्या राजकारणाला बळी पडणार नाही असे समता कला मंचचा सुवर्णा साळवे यांनी सांगितले.
आयआयटी मुंबईत विद्यार्थ्यांचा मोर्चा
आयआयटी मुंबईतही शेकडो विद्यार्थ्यांनी रविवारी रात्री संस्थेच्या आवारात मोर्चा काढून जेएमआयच्या विद्यार्थ्यांना आपला पाठिंबा दर्शवला. तत्पूर्वी नागरिकत्व सुधारणा विधेयक (कॅब) मंजूर झाले तेव्हाही आयआयटीतील विद्यार्थ्यांनी विरोध दर्शवला होता. पूर्वोत्तर राज्यांमध्ये पोलिसांकडून नागरिकांवर होत असलेल्या अमानुष अत्याचारांचा निषेधही त्यांनी नोंदवला. आयआयटी मुंबईतील आंबेडकर पेरियार फुले स्टडी सर्कलनेही (एपीपीसीसी)जेएमआयमधील विद्यार्थ्यांवर झालेल्या कारवाईचा धिक्कार केला. जेएमआयमधील कारवाईचा निषेध करणाऱ्या अलिगढ मुस्लिम विद्यापीठातील विद्यार्थ्यांवरही पोलिसांनी अमानुष कारवाई केली. त्यात 60 पेक्षा जास्त विद्यार्थी जखमी झाले. पोलिसांच्या या हल्ल्यांचा लोकशाहीतील नागरिकांनी एकत्र येऊन निषेध करणे हा त्यांचा अधिकारच आहे असे एपीपीसीसीने म्हटले आहे.
विद्यार्थ्यांनो उठा, जागे व्हा! आयआयटींमध्ये झळकली पोस्टर्स
आयआयटी मुंबईसह कानपूर आणि मद्रास आयआयटी संस्थांमध्येही विद्यार्थ्यांनी आंदोलने केली. ‘पश्चिम बंगालमधील जाधवपूर विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे आंदोलन त्यांनी चिरडले पण आपण काहीच केले नाही. त्यांनी एमटेक अभ्यासक्रमाची फी वाढवली पण आपण काहीच विरोध केला नाही. जेएनयूमधील आंदोलक विद्यार्थ्यांना त्यांनी मारहाण केली तरीही आपण प्रतिसाद दिला नाही. आता विद्यार्थ्यांनो उठा, जागे व्हा! आता जर आपण विरोध केला नाही तर विद्यार्थीहित धोक्यात येईल’ असे आवाहन करणारी पोस्टर्स आयआयटी कानपूरमध्ये झळकली आहेत.
गृहमंत्री अमित शहा राजीनामा द्या! विद्यार्थ्यांची मागणी
विद्यार्थी भारती या संघटनेनेही कल्याण येथील आंबेडकर उद्यानात निदर्शने करून दिल्ली पोलिसांचा निषेध केला. कुलगुरूंच्या परवानगीशिवाय बाहेरचे कुणीही विद्यापीठात घुसून कारवाई करू शकत नाहीत. तरीसुद्धा दिल्ली पोलिसांनी विद्यापीठात घुसून विद्यार्थ्यांना मारहाण केली हा गुन्हाच असल्याचे सांगत संघटनेच्या अध्यक्षा मंजिरी धुरी यांनी याप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी केली. उपाध्यक्षा रत्नदीप आठवले, कार्यवाह श्रेया निकाळजे, प्रणय घरत, कल्याण विकासिनीचे ऍड. उदय रसाळ आदी या आंदोलनात सहभागी झाले होते.
टिसमधील विद्यार्थ्यांचा व्याख्यानांवर बहिष्कार
टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्सेसमधील (टिस) विद्यार्थ्यांनी वर्गांमधील व्याख्यानांवर बहिष्कार घालून आपला निषेध नोंदवला. तब्बल 200 विद्यार्थी या बहिष्कार आंदोलनात सहभागी झाले. जेएमआय आणि अलिगढ मुस्लिम विद्यापीठातील विद्यार्थ्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी त्यांनी मोर्चाही काढला. हिंदुत्वाचा बुरखा घालून देशाच्या मुळावर घाव घालणाऱ्यांना हिंदुत्व माफ करणार नाही!


























































