कलम 370 हटवल्यानंतर श्रीनगरच्या जामिया मशिदीत 19 आठवड्यांनंतर पहिला नमाज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जम्मू-कश्मीरला विशेषाधिकार देणारे राज्यघटनेतील 370 कलम रद्द केल्यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून श्रीनगरमधील प्रसिद्ध जामिया मशीद सुमारे 19 आठवडे (136 दिवस) बंद ठेवण्यात आली होती. कश्मीरातील वातावरण पूर्वस्थितीत आल्यानंतर आज बुधवारी मशीद नमाजासाठी पुन्हा उघडण्यात आली. बऱयाच कालावधीनंतर उघडलेल्या मशिदीत आज 70 नमाजींनी मुफ्ती गुलाम रसूल यांच्या मार्गदर्शनाखाली पहिला नमाज अदा केला.

या मशिदीतील नमाजची रस्म इतक्या प्रदीर्घ काळ बंद राहण्याची ही 50 वर्षांतील पहिलीच वेळ आहे. जामिया मशिदीत एकाच वेळेस 30 हजार नमाजी नमाज पढू शकतात. जम्मू-कश्मीर प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी श्रीनगर शहरातील कायदा-सुव्यवस्था स्थिती आणि सामाजिक वातावरणाचा अंदाज घेऊन जामिया मशीद नमाजींसाठी खुली केली. त्यानंतर 70 नमाजींनी या मशिदीत प्रदीर्घ काळाच्या प्रतीक्षेनंतरचा पहिला नमाज अदा केला.

सुरक्षा दलांच्या उपस्थितीत नागरिकांनी नमाजास केला होता विरोध
5 ऑगस्टला शहरातील नौहट्टा विभागातील मशीद जमातच्या नमाजासाठी उघडली होती. या भागातील सुरक्षा नियमही शिथिल करण्यात आले होते. पण स्थानिक निवासी नागरिकांनी सुरक्षा दल विभागातून हटवल्याशिवाय मशिदीत नमाजाला नकार दिला होता. आज श्रीनगरमधील स्थिती सुधारल्यामुळे या भागातील सुरक्षा दलांच्या तैनात तुकड्या कमी करण्यात आल्या. त्यानंतर शहरातील जामिया मशिदीत पहिला नमाज अदा करण्यात आला.