येवल्यात दोन गुन्हेगारांना 3 गावठी कट्टे, २६ जिवंत काडतुसांसह अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

धुळे येथून नगरकडे जाणाऱ्या एका क्रेटा गाडीतून 3 गावठी कट्टे, 26 जिवंत काडतुसे, चार मॅगझीन असा 10 लाख 87 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नगर जिल्ह्यातील दोन सराईत गुन्हेगार देखील जेरबंद करण्यात आले आहेत.

बुधवारी सकाळच्या सुमारास गुन्हे शाखेचे पथक तालुका परिसरात गस्त घालत असताना त्यांना खबऱ्यांमार्फत याबाबत गुप्त माहिती मिळाली होती. नगर जिल्ह्यातील काही सराईत गुन्हेगार घातक शस्त्र बाळगून धुळ्याकडून नगरच्या दिशेने येणार असल्याची माहिती मिळाल्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शहरातील विंचुर चौफुली परिसरात सापळा रचला. यात शहराचे दिशेने येत असलेली एक सफेद रंगाची क्रेटा (एम.एच.16,बी.एच. 8380) कार अडवली. संशयावरून सदर वाहनातील संशयित दिनेश ज्ञानदेव आळकुटे, (वय 30,रा. पाईपलाईन रोड, सावेडी, जि. नगर) व सागर मुरलीधर जाधव (वय 21, रा.ब्राम्हणी, ता.राहुरी, जि.नगर) यांचेसह क्रेटा कारची झडती घेतली गेली. या झडतीत त्यांच्याकडून तीन गावठी पिस्टल, 26 जिवंत काडतुसे, व चार मॅगझिन अशी घातक शस्त्रे तसेच मोबाईल फोन, क्रेटा कार असा एकूण 10 लाख 87 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या दोन आरोपींविरुद्ध शहर पोलीस ठाणे येथे भारतीय हत्यार कायदा कलम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील संशयित दिनेश आळकुटे याच्यावर यापूर्वी नगर जिल्ह्यातील तोफखाना पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल आहे. सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक के.के.पाटील, स. पो. नि. स्वप्निल राजपुत, उपनिरीक्षक संजयकुमार सोने यांच्या नेतृत्वातील पथकाने केली.