शिक्षा होण्यापूर्वीच मुशर्रफ मरण पावले तर…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशद्रोहाच्या आरोपाप्रकरणी फाशीची शिक्षा ठोठावण्यात आलेले पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ हे जर शिक्षेची अंमलबजावणी होण्यापूर्वीच मरण पावले तर त्यांचा मृतदेह फरफटत आणावा. तसेच इस्लामाबादच्या ‘डी’ चौकात तब्बल तीन दिवस लटकवून ठेवण्यात यावा असे अजब निर्देश पेशावर उच्च न्यायालयाने आपल्या 167 पानी निकालपत्रात दिल्याचे आज समोर आले. आज उपलब्ध झालेल्या निकालाच्या या प्रतीमधील हे निर्देश संपूर्ण पाकिस्तानात वाऱयासारखे पसरले आणि एकच खळबळ उडाली.

मुशर्रफ यांना दोनच दिवसांपूर्वी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. त्याबाबतच्या निकालपत्रात न्यायालयाने या प्रकरणातील फरारी असलेल्या दोषी गुन्हेगारांना पकडून आणण्यासाठी सुरक्षा यंत्रणांनी आपल्या परीने सर्व ते प्रयत्न करावेत. तसेच कायद्यानुसार शिक्षेची अमलबजावणी करावी असे बजावले आहे. ही प्रत आज सर्वच पक्षकारांना उपलब्ध करून देण्यात आली.

पेशावर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश वकार अहमद सेठ यांच्या नेतृत्वाखालील त्रिसदस्यी खंडपीठाने 2 विरुद्ध 1 या मताने हा निकाल दिला. मुशर्रफ यांनी देशद्रोहाचा गुन्हा केला आहे, यावर मुख्य न्यायाधीश सेठ आणि करीम यांचे एकमत झाले तर न्यायाधीश अकबर यांनी विरोधी मत मांडले. निकालपत्राच्या परिच्छेद 66 मध्ये मुशर्रफ यांच्याबद्दल हा उल्लेख आहे. शिक्षेआधी ते मरण पावल्यास त्यांचा मृतदेह रस्त्यावरून फरफटत आणावा. तसेच तीन दिवस ‘डी’ चौकात लटकवून ठेवण्यात यावा असे म्हटले आहे. 3 डिसेंबर 2007 रोजी देशभरात आणीबाणी लागू करताना परवेझ मुशर्रफ यांनी काही न्यायाधीशांनादेखील अटक केली होती. याप्रकरणी त्यांच्यावर 2013 साली गुन्हा दाखल करण्यात येऊन 31 मार्च 2014 रोजी देशद्रोहाचा खटला भरण्यात आला होता.

माझ्यावरील कारवाई सूडबुद्धीने

माझ्यावरील शिक्षेची कारवाई ही सूडबुद्धीने करण्यात आली आहे. यात कायद्याचे पालन झालेले नाही. काही लोकांच्या मनात माझ्याविषयी असलेली कटुता या निर्णयातून स्पष्ट दिसत आहे, अशा शब्दांत पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी आपल्या फाशीच्या निर्णयावर पहिलीच प्रतिक्रिया गुरुवारी दिली.

प्रत्यक्ष अंमलबजावणी तूर्त तरी अशक्य

दरम्यान, ऍमिलॉईडोसिसं या दुर्धर आजाराने ग्रस्त असलेले परवेझ मुशर्रफ हे सध्या दुर्बइला गेले असून तेथे त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांतर्फे देण्यात आली. त्यामुळे फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी तूर्त तरी अशक्य वाटत आहे.