अबब!! पोलिसांनी पकडला दोन कोटींचा गांजा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

धुळ्याला जाणारा 400 किलो गांजा पोलिसांनी मंठा येथे जप्त केला आहे. या गांजाची किंमत सुमारे दोन कोटी रुपये इतकी आहे. या कारवाईमुळे केरळमधून महाराष्ट्रात गांजा तस्करी होत असल्याची माहितीही उघड झाली आहे.

केरळ राज्यातील तिरुवअनंतपुरम इथून गुरुवारी मध्यरात्री एक ट्रक येणार असल्याची माहिती मंठ्याचे पोलीस निरीक्षक विलास निकम यांना मिळाली होती. त्यानुसार मध्यरात्री जालना रोडवर बालाजी जिनिंगसमोर सापळा रचण्यात आला. या सापळ्यात ट्रक क्रमांक एम एच 20 डीई 6777 सापडला. या ट्रकचा चालक संजय सिंघल (रा. वैजापूर) याला ताब्यात घेण्यात आले आणि ट्रकची झडती घेतली.

झडती घेतल्यानंतर ट्रकमध्ये सुमारे 400 किलो गांजा असल्याचे आढळले. ट्रक आणि त्यातील गांजा असा दोन कोटींचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून पुढील कारवाई सुरू आहे.