सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणाऱ्यांना गोळ्या घाला, भाजप नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नागरिकत्व कायद्यावरून सध्या देशभरात आंदोलनं सुरू असून या आंदोलनांना हिंसक वळण लागलं आहे. आतापर्यंत या हिंसाचारात वीस हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे तर मोठ्या प्रमाणात सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान झालं आहे. दरम्यान भाजपचे पश्चिम बंगालमधील नेते व राज्याचे भाजप अध्यक्ष दिलीप घोष यांनी सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणाऱ्यांना गोळ्या घातल्या पाहिजे, असे वादग्रस्त विधान केलं आहे.

पश्चिम बंगालमधील काही विद्यार्थी संघटनांनी नागरिकत्व कायद्याचा विरोध करण्यासाठी कोलकातातील भाजप मुख्यालयाला घेराव घालण्याचे ठरवले होते. दरम्यान नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ दीलीप घोष यांनी एका रॅलीचे आयोजन केले होते. त्या रॅलीत बोलताना त्यांनी दोन वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. ‘आंदोलनाच्या नावाखाली सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणाऱ्या गोळ्या घातल्या पाहिजे. तसेच जे कुणी भाजप कार्यालयाला घेराव घालायच्या तयारीत आहेत. त्यांनी तेथे येताना स्वत:सोबत स्ट्रेचर घेऊन यावे कारण ते तेथून स्वत:च्या पायावर परत जाणार नाहीत’ अशी वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केली आहेत.