
नवीन वर्षात बँका काही नवीन नियम लागू करणार आहेत. त्यातलाच एक नियम डेबिट कार्डबाबतचा आहे. रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार नवीन वर्षात सर्व बँकांना मॅग्नेटिक स्ट्रिप असलेली डेबिट कार्ड बंद करावे लागणार आहेत. त्यामुळे नव्या वर्षात मॅग्नेटिक स्ट्रिप असलेली कार्ड ग्राहकांना वापरता येणार नाहीत. देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या भारतीय स्टेट बँक म्हणजेच एसबीआयने आपल्या खातेधारकांना याबाबतची माहिती दिली आहे.
वाढत्या सायबर क्राईममुळे रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना मॅग्नेटिक स्ट्रिप असलेले कार्ड बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार एसबीआयने हा निर्णय घेतला आहे. आपल्याकडील मॅग्नेटिक स्ट्रिप असलेले कार्ड नाही बदलले तर 1 जानेवारी 2020 पासून ते कार्ड बंद होतील आणि त्याद्वारे कोणताही व्यवहार करता येणार नाही. त्यामुळे खातेधारकांकडे मॅग्नेटिक स्ट्रिप असलेले कार्ड असल्यास ते बदलून ईएमव्ही चिप असलेले कार्ड घेण्याचे आवाहन बँकेने केले आहे.
जुने मॅग्नेटिक स्ट्रिप असलेले कार्ड बदलण्यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही, असेही बँकेने स्पष्ट केले आहे. शुल्क आकारल्याचे लक्षात आल्यास खातेधारक त्याच्या परताव्यासाठी अर्ज करू शकतात, असेही बँकेने म्हटले आहे. इंटरनेट बॅंकिंग, योनो अॅप किंवा बँकेच्या जवळच्या शाखेत जाऊन खातेधारकांना कार्ड बदलता येणार आहेत.


























































