नागरिकत्व कायद्याला वाढता विरोध पाहून सरकारची भाषा बदलली, एनआरसीवरून मोदी बॅकफूटवर!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सुधारित नागरिकत्व कायद्याला देशभरातून हिंसाचाराने विरोध होत असल्याने केंद्र सरकारची आता भाषा बदलली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तर ‘एनआरसी’वरून बॅकफूटवरच गेले आहेत. रविवारी त्यांनी रामलीला मैदानात सुप्रीम कोर्टाच्या आदेशावरून एनआरसी फक्त आसाममध्येच लागू करणार असे ठामपणे सांगितले आणि गृहमंत्री अमित शहा व भाजप या दोघांनाही खोटे पाडले.

नागरिकत्व कायदा आणि एनआरसीवरून उसळलेल्या आगडोंबाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी रामलीला मैदानावरील सभेत आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, मी हिंदुस्थानातील 130 कोटी जनतेला सांगू इच्छितो की, 2014 साली पहिल्यांदा माझे सरकार सत्तेत आले तेव्हापासून आतापर्यंत आसाम सोडून इतरत्र एनआरसी लागू करण्याबाबत कुठेही, कसलीही चर्चा झालेली नाही. सर्वोच्च न्यायालयाचा आदेश पाळून आम्हाला फक्त आसाममध्ये याची अंमलबजावणी करायचीय असे स्पष्ट करत मोदींनी एनआरसीबाबत खोटय़ा बातम्या पसरवल्या जात असल्याची टीका केली.

विरोधक मुस्लिमांसह सर्व जनतेला भडकावताहेत, मला टार्गेट करण्यासाठी देश तोडायला निघालेत. सरकार छावण्या सुरू करीत असल्याची अफवा पसरवताहेत अशी टीका करतानाच मोदींनी हिंदुस्थानातील मुस्लिमांना त्यांच्या हक्कांना अजिबात धक्का लागणार नाही असे आश्वस्त केले. विरोधक हिंदुस्थानी मुस्लिमांना घाबरवण्याचे काम करताहेत. अर्बन नक्षलवादीही खोटी माहिती पसरवताहेत. निवडणुकीत जनतेने नाकारल्यानंतर विरोधकांनी हे जुने अस्त्र्ा बाहेर काढलेय असे ते म्हणाले.

किमान गांधीजींचे तरी ऐका!

काही जण गांधी आडनावाचा गैरफायदा घेताहेत. अनेकांना वाटत असेल की मोदींनी सुधारित कायदा केला. पण हे महात्मा गांधीजींनीच सांगितले होते. म्हणूनच विरोधकांना एवढेच सांगेन की, माझे ऐकायचे नसेल तर ऐकू नका पण गांधीजींचे तरी ऐका. हिंदुस्थान-पाकिस्तान फाळणीवेळी गांधीजी म्हणाले होते की, पाकिस्तानातील हिंदू आणि शीख बांधवांना जेव्हा वाटेल तेव्हा त्यांचे हिंदुस्थानात स्वागत केले जाईल अशी आठवण करून देत मोदींनी अप्रत्यक्षरीत्या राहुल गांधींना सुनावले.

काय म्हणाले होते शहा…

घुसखोरांना हाकलून लावण्यासाठी मोदी सरकार संपूर्ण देशभरात एनआरसी लागू करणारच. हे जेव्हा घडेल तेव्हा एकही घुसखोर हिंदुस्थानात शिल्लक राहणार नाही. आम्ही ज्यावेळी देशव्यापी एनआरसी संसदेत आणू त्यावेळी त्यावर चर्चा केली जाऊ शकते. नागरिकत्व विधेयकाचा एनआरसीशी संबंध जोडण्याचा प्रयत्न करू नका. मान के चलिए एनआरसी आने वाला है…
कायद्याला विरोध असेल तर माझे पुतळे जाळा, हवंतर पुतळ्याला जोडय़ाने हाणा, पण देशातील संपत्ती जाळू नका!

दिल्ली प्रचाराचा नारळही फोडला

मोदींनी या वेळी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे अप्रत्यक्षरीत्या रणशिंग फुंकले. कोणत्याही पक्षाने प्रामाणिकपणे काम केलेले नाही. आम्ही करीत होतो त्यात त्यांनी आडकाठी आणली अशा शब्दांत त्यांनी ‘आप’वर हल्ला चढवला.

भाजपच्या वचननाम्यात…

घुसखोरांमुळे काही भागांची सांस्कृतिक आणि भाषिक ओळख पूर्णपणे बदलली आहे. त्यांचा स्थानिकांच्या उदरनिर्वाह आणि रोजगारावर विपरीत परिणाम झाला आहे. आम्ही प्राधान्याने या भागांत एनआरसी लागू करू. नंतर उरलेल्या भागांत टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करू, असे भाजपने म्हटले होते.

तरुणांनो, मोदी आणि शहा यांनी तुमचे भविष्य बरबाद केले!

तरुणांनो, नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी तुमचे भविष्य अक्षरशः बरबाद करून टाकले. नोकऱ्या नाहीत, अर्थव्यवस्थेची तर पार वाट लावून टाकली आहे. अशा परिस्थितीत तुमच्या संतापाचा सामना करण्याची ताकद त्यांच्यात नाही. त्यामुळे ते हिंदुस्थानात उभी फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत अशा शब्दांत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी हल्लाबोल केला आहे. नागरिकत्व सुधारणा विधेयक घटनाबाह्य असल्याचे राहुल यांनी म्हटले आहे. दरम्यान, नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात राहुल गांधी उद्या सोमवारी राजघाट या ठिकाणी सत्याग्रह आंदोलन करणार आहेत. या आंदोलनात अनेक दिग्गज नेते सहभागी होणार आहेत.