एल्गार परिषद प्रकरण, पोलिसांची चौकशी करायला हरकत नाही – रामदास आठवले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
ramdas-athawale

भीमा-कोरेगाव आणि एल्गार परिषदेचा संबंध नाही. एल्गार परिषदेत नक्षलवादी विचारांचे लोक होते हे पुढे आले आहे. एल्गारप्रकरणी पोलिसांनी चूक केली असेल तर त्यांची चौकशी करायला हरकत नाही असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

या पत्रकार परिषदेत ‘रिपाइं’चे राष्ट्रीय कोषाध्यक्ष एम. डी. शेवाळे, प्रदेश सरचिटणीस राजाभाऊ सरोदे, प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, शहराध्यक्ष अशोक शिरोळे, पश्चिम महाराष्ट्र युवक आघाडीचे अध्यक्ष परशुराम काडेकर, राष्ट्रीय निमंत्रक मंदार जोशी आदी उपस्थित होते.

रामदास आठवले म्हणाले, आम्ही आंबेडकरवादी आहोत. आंबेडकरी विचारांचा नक्षलवादी विचारांशी संबंध नाही. हिंसेला हिंसेने उत्तर योग्य नाही. दोषींवर कारकाई व्हावी. एल्गारप्रकरणी पोलिसांनी निष्पक्ष चौकशी करावी. नक्षलवाद्यांनी आंबेडकरवाद स्वीकारावा.

नागरिकत्व दुरुस्ती कायदा देशातील मुस्लिमांच्या विरोधात नाही, विधेयकाच्या गैरसमजुतीतून सध्या आंदोलने होत आहेत. आपल्या देशात हिंसक आंदोलन होणे योग्य नाही. अयोध्येच्या निर्णयावर दोन्ही धर्मांकडून शांतता राखण्यात आली होती. देशातील मुस्लिमांना कोणताही त्रास होणार नाही. त्यामुळे मुस्लिम बांधकांनी शांतता राखावी, असे आवाहन आठवले यांनी केले.