नाताळची सुट्टी, दहावीची प्रीलियम परीक्षाविद्यार्थ्यांची कलचाचणी घ्यायची कधी?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दहावीच्या विद्यार्थ्यांची 27 डिसेंबर ते 18 जानेवारी दरम्यान घेण्यात येणाऱया कलचाचणीवरून शाळांमध्ये सध्या गोंधळाचे वातावरण आहे. बहुसंख्य इंग्रजी माध्यमाच्या शाळांना 3 जानेवारीपर्यंत नाताळची सुट्टी आहे. त्यानंतर जानेवारीच्या दुसऱया आठवडय़ात प्रीलियम परीक्षा होणार आहे. त्यामुळे ही कलचाचणी घ्यायची कशी असा प्रश्न शाळांना पडला आहे.

दहावीची परीक्षा देणाऱया विद्यार्थ्यांचा उच्च शिक्षणातील कल तपासण्यासाठी या विद्यार्थ्यांची कलचाचणी घेण्यात येते. ऑनलाइन पद्धतीने मोबाईल किंवा संगणकावर ही कलचाचणी शाळास्तरावर घेण्याच्या सूचना राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने शाळांना दिल्या आहेत. पण कलचाचणी घेण्याच्या वेळापत्रकावरून शिक्षकांमध्ये नाराजी पसरली आहे. कलचाचणीचे सुरुवातीचे चार ते पाच दिवस हे नाताळच्या सुट्टीत जाणार आहेत. त्यानंतर 6 तारखेच्या पुढे जानेवारीच्या दुसऱया आठवडय़ात विद्यार्थ्यांची प्रीलियम परीक्षा ठरलेली आहे. त्यामुळे कलचाचणीचे वेळापत्रक ठरविताना शाळांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे, असे टीचर्स डोमॅक्रटिक फ्रंटचे राजेश पांडया यांनी सांगितले.

कलचाचणीचा ‘आढावा घ्यायला हवा
गेल्या चार वर्षांपासून दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी कलचाचणी सक्तीची करण्यात आली आहे. मात्र पुढे अकरावी किंवा अन्य शाळा निवडताना विद्यार्थी कलचाचणीच्या निकालाचा आधार घेतात का, या परीक्षेचा विद्यार्थ्यांना कितपत फायदा होतो याचा आढावा घ्यायला हवा, अशी मागणीही पांडया यांनी केली आहे.