
गोवंडीत गणेशवाडी येथे शौचालयाच्या टाकीत पडून तीन मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. शौचालयाची टाकी साफ करताना हे मजूर अचानक आत अडकले. ही माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन त्यांना बाहेर काढले, मात्र टाकीत गुदमरल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.
गोवंडी गणेशवाडी येथे ही ‘मोरया एसआरए गृहनिर्माण सोसायटी’ आहे. या सोसायटीच्या सेप्टिक टँकची स्वच्छता करण्याचे काम करण्यात येत होते. मात्र काम सुरू असतानाच दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास तीनही कामगार टाकीत पडले. अग्निशमन दलाने या तिघांनाही बाहेर काढून जवळच्या शताब्दी रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारांपूर्वीच त्यांना मृत्यू झाला. या दुर्घटनेत विश्वजीत देवनाथ (32), संतोष काळसेकर (45) आणि गोविंद चारोटिया (34) या तीन कामगारांचा मृत्यू झाला. या घटनेची चौकशी केली जाणार असल्याची माहिती संबंधित किभागाच्या एका अधिकाऱ्याने दिली.
आठ महिन्यांपूर्वीही तीन सफाई कामगारांचा मृत्यू
शौचालयाच्या टाकीत पडून मृत्यू होण्याच्या घटना गेल्या काही दिवसांत वाढल्या आहेत. मे 2019 मध्ये नालासोपारा येथे अशाच प्रकारे तीन मजुरांचा शौचालयाच्या टाकीची साफसफाई करत असताना सेप्टिक टँकमध्ये गुदमरून मृत्यू झाला होता, तर ठाण्यातील ढाकोली भागात अशीच घटना घडली होती. तेथेही तिघे कामगार गुदमरून मृत्युमुखी पडले होते.
























































